* माणगाव तर्फे वरेडी जि.प. मतदारसंघात आक्रमक प्रचार ; 5,078 मतांची ताकद दाखवली
* निकाल विरोधात असला तरी तत्त्वनिष्ठ राजकारणाची ठसठशीत छाप
* कार्यकर्त्यांत नवचैतन्य ; आगामी निवडणुकांसाठी संघटन बळकट करण्याची तयारी
कर्जत / नरेश जाधव :- राजकारणात विजयाइतकीच महत्त्वाची असते ती संघर्षाची कहाणी. रायगड जिल्हा परिषद निवडणूक 2026 मध्ये माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांच्या वहिनी राधिका किशोर ठाकरे निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. निकाल पक्षाच्या विरोधात गेला असला, तरी या निवडणुकीत दिलेला आक्रमक, स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ लढा ‘फ्लॉवर नाही, फायर है’ ही किरण ठाकरे यांची ओळख अधिक ठळक करणारा ठरला आहे.
* सत्ता-संसाधनांच्या जोरासमोरही न झुकता प्रचाराचा धडाका :- सत्ता, संसाधने आणि विरोधकांची एकत्रित ताकद समोर असतानाही किरण ठाकरे यांनी प्रचाराचा वेग कमी होऊ दिला नाही. गावोगावी प्रत्यक्ष भेटी, पदयात्रा, बैठका आणि घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत त्यांनी प्रचारात आक्रमकता टिकवून ठेवली. “राजकारण हे सत्तेसाठी नव्हे, तर जनतेच्या स्वाभिमानासाठी” हा ठाम संदेश देत त्यांनी स्थानिक प्रश्न, विकासाची दृष्टी आणि संघटन बळ यांवर भर दिला.
* 5,078 मतांची साथ ; संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन :- निकालाच्या आकड्यांपलीकडे पाहिल्यास 5,078 मतांची साथ ही संघटनात्मक ताकदीची साक्ष मानली जात आहे. मर्यादित संसाधनांतही मिळालेला हा जनाधार भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी भक्कम पाया ठरू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनीही या लढतीला केवळ निवडणूक नव्हे, तर तत्त्वनिष्ठ राजकारणाची चळवळ म्हणून पाहिले.
* पराभवातूनही कार्यकर्त्यांत नवचैतन्य :- पराभव असूनही कार्यकर्त्यांमध्ये निराशा नाही, उलट नवचैतन्य निर्माण झाले आहे. बूथस्तरीय बांधणी, संघटन विस्तार आणि युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी पुढील काही महिन्यांत व्यापक कार्यक्रम राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. या लढतीने आमची ओळख तयार झाली आहे. पुढच्या निवडणुकांत अधिक मजबूत होऊन उतरू, असा निर्धार कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
* संघर्षशील प्रतिमा हीच खरी कमाई :- राजकीय अभ्यासकांच्या मते, या निवडणुकीतील खरी कमाई म्हणजे संघर्षशील प्रतिमा, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि जनतेशी जोडलेले नाते. तडजोड न करता दिलेल्या आक्रमक व स्वाभिमानी लढ्यामुळे ‘फ्लॉवर नाही, फायर है’ ही किरण ठाकरे यांची प्रतिमा कर्जत-खालापूर पट्ट्यात ठसठशीतपणे उभी राहिली आहे. आगामी काळात ही प्रतिमा कितपत प्रभाव टाकते आणि संघटनात्मक बळ कसे विस्तारते, याकडे आता संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
