बारामती / अक्षय कांबळे :- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या विरोधात व देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती येथे सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा नेतृत्व युगेंद्र पवार उपस्थित होते. स्व.संतोष देशमुख आणि स्व. महादेव मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असे युगेंद्र पवार बोलत होते. शिवाय, देशमुख व मुंडे कुटुंबीयांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत उभे आहोत, असेही स्पष्ट केले.
स्व. संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे झालेली हत्या ही मानवतेसाठी कलंक आहे. क्रौर्याच्या सर्व सीमा पार करुन झालेली ही अमानुष मारहाण आणि त्या क्रुर घटनेचे पुढे आलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून समाजमन अत्यंत व्यथित झाले आहे. त्यामुळे आरोपींवर कोणतेही दया-माया न दाखवता कठोरातली कठोर शिक्षा म्हणून फाशीच झाली पाहिजे.
मानवतेच्या दृष्टिकोनातून आयोजित या मोर्चास स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख यांच्यासह बारामतीकर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सरकारने याची दखल घेऊन या खून प्रकरणाशी संबंधित सर्वावर कठोरात कठोर कारवाई करून देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चामध्ये करण्यात आली.
