अंबोली स्मशानभूमी बंद ठेवल्याने शिवसेना आक्रमक

* अंधेरी पश्चिममधील अंबोली स्मशानभूमी दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवल्याविरोधात महानगरपालिका विरोधात निषेध आंदोलन

मुंबई / जगदीश का. काशिकर :- दुरुस्तीच्या नावाखाली अंधेरी पश्चिम येथील सीझर रोडवरील अंबोली हिंदू स्मशानभूमी पालिका प्रशासनाकडून 1 डिसेंबर 2024 पासून बंद ठेवण्यात आली आहे. स्मशानभूमी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आजपर्यंत पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही  झालेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या या नियोजन शून्य निष्काळजीपणामुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे.

या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग  प्रमुख अनिल परव यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रसाद आयरे यांच्या पुढाकाराने स्मशानभूमीसमोर महानगर पालिकेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकारी यांच्यासह अंधेरीतील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील 3 महिन्यांपासून बंद असलेल्या स्मशानभूमीमुळे स्थानिक रहिवाशांना अंत्यसंस्कारासाठी लांब अंतरावर जावे लागते. तसेच रुग्णवाहिका चालक देखील शव स्मशानभूमी मध्ये नेण्याकरीता स्वतः च्या मनाप्रमाणे वाटेल ते दर आकारतात, ज्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या सरकारच्या काळात जगण्यासोबत मरण देखील महाग आणि त्रासदायक झाले आहे, अशी भावना यामुळे नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

स्मशानभूमी ही नागरिकांची मुलभूत गरज असून ती लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रशासनाने त्वरित योग्य ती पावले उचलावीत ही मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. यावेळी विभाग संघटक अनिता बागवे, विधानसभा संघटक वीना टॉक, सहसंघटक ज्योत्सना दिघे, उपविभाग संघटक संजीवनी घोसाळकर, प्राणिया सावंत, पूजा पाटील, शाखा प्रमुख दयानंद कड्डी, उदय महाले, सुधाकर आहिरे, दीपक सणस, एकनाथ केलकर, रेवती सुर्वे, छाया खानदेशी, मनाली पाटील, स्वाती तावडे तसेच ग्राहकचे मनोज  जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post