* नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली दरम्यान होणारा ऐरोली-काटई मार्ग पूर्ण होणे बिकट..!
ठाणे / अमित जाधव :- नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या शहरांतील प्रवाशांचा प्रवास वेगवान करण्याच्या दृष्टीने ऐरोली-काटई होणार असून एकूण भुसंपादनासाठी शासनाकडे ४०८ कोटी ७५ लाख रुपयांची मागणी असून या १२ किलोमीटरच्या मार्गांची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकरणी सदर रस्ता ठाणे महापालिकेच्या हद्दीतील शीळ, डावले, डोमखार आणि देसाई गावातून जाणार आहे. या जागेचे भुसंपादन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेची आहे.
या नियोजित ४५ मीटर ते ६५ मीटर ऐरोली-कटाई मार्गांपैकी ३० मीटर रुंदीकरीता भुसंपादनाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून या कामासाठी निधी देण्याची मागणी राज्य शासनाकडे सात महिन्यांपुर्वी केली होती. परंतु एमएमआरडीएने मात्र ३० ऐवजी विकास आराखड्यात दाखविल्याप्रमाणे ४५ मीटर रुंद रस्त्याचे भुसंपादन करण्याबाबत पालिकेला कळविले होते. यामुळे पालिकेने नव्याने प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्तावास पालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यता दिली असून हा प्रस्ताव शासनाकडून पाठवून निधीची मागणी करण्यात आली आहे. ठाणे पालिकेच्या तिजोरीत पैसेच नसल्याने या मार्गांच्या उभारणीचा मार्ग बिकट असल्याचे चित्र दिसून येत असून त्यासाठी ठाणे महापालिका राज्य सरकारकडे सातत्याने मागणी करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी सदर ऐरोली-काटई रस्ता रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
