खोपोली / प्रतिनिधी :- महिला सक्षमीकरणाला बळकटी देण्याच्या उदात्त हेतूने महिला दिनाचे औचित्य साधत खालापुर प्रेस क्लब आणि रायगड क्लब यांच्या वतीने खोपोली व खालापूर तालुक्यातील महिलांचा सन्मान सोहळा खोपोली नगर परिषद हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खोपोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी संगिता वानखेडे, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, खालापुर प्रेस क्लब अध्यक्ष भाई ओव्हाळ, कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक फिरोज पिंजारी, साप्ताहिक खालापुर वादळचे मुख्य संपादक खलील सुर्वे, पत्रकार समाधान दिसले, पत्रकार संतोषी म्हात्रे, पत्रकार सारिका सावंत, पत्रकार मानसी कांबळे, खोपोली नगर परिषदेचे कर्मचारी विनोद सोलंकी, स्वप्निल देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी महिला पत्रकार सारिका सावंत, दै. कोकण प्रदेश न्यूजच्या निवासी संपादक मानसी गणेश कांबळे यांच्यासह खोपोली नगर परिषद दवाखाना विभागातील सर्व नर्स, डॉंक्टर आणि महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे व खालापुर प्रेस क्लब अध्यक्ष भाई ओव्हाळ यांनी महिलांचा सन्मान करीत त्यांच्याकडून जास्तीत जास्त समाजसेवा घडावी, अशा शुभेच्छा दिल्या. हा तुमचा सन्मान आहेच परंतु ही एक तुम्हाला मिळालेली जबाबदारी आहे, असे मनोगत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली.
