* महिला दिनी बेलापूर ते कर्जत बाईक रॅलीसह महिलांसाठी प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन
कर्जत / प्रतिनिधी :- लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट (Light of Life Trust) आणि कल्याण ट्रस्ट (Kalyan Trust) यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक जाणीव आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी बेलापूर ते कर्जत बाईक रॅली तसेच कर्जत ते तिवरे प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विविध सत्रांमधून महिलांच्या आरोग्य, शिक्षण, उद्योजकता आणि सशक्तीकरणावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात बेलापूर ते कर्जत बाईक रॅलीने झाली, ज्यामध्ये ५० रायडर्स उत्साहाने सहभागी झाले. ही राईड एलआरएमसी (LRMC-Let’s Ride for Meaningful Causes) यांच्या व्यवस्थापनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. त्यानंतर कर्जत ते तिवरे रॅली काढण्यात आली. उपस्थितांचे चहा व नाश्त्याने स्वागत करण्यात आले आणि कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले.
कार्यक्रमाला लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट (Light of Life Trust) च्या संस्थापिका डॉं. विली डॉंक्टर, सीईओ रमेश दासवानी, सीओओ कमल दमानिया, शीला अय्यर, सेजल शाह आणि रिसोर्स मोबीलायजेशन आकाश कांबळे तसेच "आनंदो" आणि "जागृती" टीमचे सदस्य उपस्थित होते. याशिवाय, आशा मॅडम, शीला मॅडम आणि सुधीर गजबिये देखील उपस्थित होते. कार्यक्रमात १०० लाभार्थी महिला सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमात लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट (Light of Life Trust) आणि त्यांच्या उपक्रमांवर सादरीकरण करण्यात आले. तसेच "जागृती" आणि "आनंदो प्लस" या उपक्रमाच्या लाभार्थी महिलांनी आपल्या अनुभवांचे कथन केले. महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने महिलांचे आरोग्य, एसटीईएम (STEM) क्षेत्रातील संधी, कायदेशीर हक्क आणि उद्योजकता यांसारख्या विषयांवर चर्चासत्रे झाली.
यावेळी कर्जत येथील "अनंत" उपक्रमातील मुलींनी गीत व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. डॉं. विली डॉंक्टर यांच्या हस्ते १० रायडर्सना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त यांनी प्रेरणादायी भाषण देत महिलांना सक्षम होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचा मुख्य बिंदू हा बाईक रॅली होता. या बाईक रॅली कार्यक्रमाची सुरुवात नवी मुंबई ते कर्जत तिवरे सेंटर आणि कर्जत बाजारपेठ या परिसरातून काढण्यात आली. या रॅलीचा उद्देश सामाजिक जागरूकता निर्माण करणे आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट (Light of Life Trust) ने शिक्षण, लाईव्हहुड (livelihood), आरोग्य आणि पर्यावरण विभागाच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात घडविलेल्या परिवर्तनाचा प्रचार करणे हा होता.
जागृती टीमने विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये रांगोळी, मेहंदी, मेकअप आणि हेअरस्टाईल यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षारोपण करण्यात आले, ज्यामध्ये रायडर्सनी सक्रिय सहभाग घेतला. भोजनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट (Light of Life Trust) आणि कल्याण ट्रस्ट (Kalyan Trust) यांच्या पुढाकाराने आयोजित हा उपक्रम महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरला असून सहभागी महिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

