* ना. बाबासाहेब पाटील, ना. भरतशेठ गोगावले, आ. महेंद्र थोरवे यांच्यात चर्चा
कर्जत / प्रतिनिधी :- पेण अर्बन सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या समवेत आ. महेंद्र थोरवे यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांसह सहकार भवन मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत ठेवीदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. ना. बाबासाहेब पाटील यांनी या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याचे ठोस आश्वासन दिले.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला होता. आता स्थिर सरकार आल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. महेंद्र थोरवे आणि ना. भरतशेठ गोगावले यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांसह ना. बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली.
ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार विभागाकडून प्रयत्न करण्याची ग्वाही देण्यात आली. याप्रसंगी राज्याच्या सहकार विभागाकडून ठेवीदारांच्या न्यायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांची माहिती घेऊन लवकर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
बैठकीस सहकार आयुक्त दिपक तावरे, अप्पर निबंधक कोथिंबीर, खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, संघर्ष समितीचे अध्यक्ष शिरीष भिवरे, सदस्य अनिल बोभाटे, संतोष चौधरी, रविंद्र दणे, मोहन सुर्वे, प्रदीप शहा आदी उपस्थित होते.
