* राज्यपालांच्या हस्ते मिळाला पुरस्कार
मुंबई / प्रतिनिधी :- सेवाभावी अधिकारी म्हणून सर्व परिचित असणारे आय.ए. एस. अधिकारी अशोक काकडे यांना उत्कृष्ट सेवाभावी कार्याबद्दल 'सेवा रत्न पुरस्कार' देऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. काकडे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये शासनाच्या अनेक सेवाभावी प्रोजेक्टमध्ये आपले मोठे योगदान दिले आहे. या योगदानाची दखल घेऊन आज मुंबईमध्ये काकडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार वितरणाच्या वेळी अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती.
साईदिशा प्रतिष्ठान व इंडियाज टॅलेंट सम्मान फोरम (आयटीएसएफ) या संस्थेच्यावतीने यंदाचा सेवा रत्न पुरस्कार पुणे येथील सारथीचे व्यवस्थापकीय संचालक आय. ए. एस. अधिकारी अशोक काकडे यांना जाहीर झाला होता. आज विलेपार्लेच्या मुकेश पटेल सभागृहात मोठ्या उत्साहात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते सयाजी शिंदे, गायक शंकर महादेवन, गायिका वैशाली सामंत यांना नटसम्राट बालगंधर्व गौरव पुरस्कार तर गायिका पिहू शर्मा आणि गायक अंगद राज यांना नटसम्राट बालगंधर्व रायझिंग स्टार अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर उत्कृष्ट सेवा कार्यासाठी अशोक काकडे यांना सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साईदिशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक दत्तात्रय बाळकृष्ण माने व इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.
सेवा रत्न पुरस्काराला उत्तर देताना अशोक काकडे म्हणाले की, शासनाने माझ्याकडे वेगवेगळे प्रोजेक्ट दिले होते. त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून अनेक चांगले काम माझ्या हातून घडले. लहानपणापासून माझ्या वडिलांची एक शिकवण आहे, ती म्हणजे लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण काम करायचे. तीच शिकवण वेगवेगळ्या कामांमधून पुढे दिसत आहे. सध्या सारथीच्या माध्यमातून चार साडेचार हजार हातांना काम मिळाले. देशभरामध्ये आयएएस, आयपीएस हा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रोज आपल्या हातून काहीतरी चांगले करावे, या उद्देशातून माझे पाऊले सातत्याने पडत असतात. माझ्या कामाला सर्वांची साथही मिळते. या 'सेवा रत्न पुरस्कारा'च्या माध्यमातून मला निश्चितच अजून काम करण्याची अधिकची ऊर्जा मिळणार आहे. मला खात्री आहे या पुढेही माझ्या हातून खूप चांगले काम होईल.
शासकीय सेवेत मिळवलेल्या दैदीप्यमान यश व त्यातून केलेली राष्ट्र व जनसेवेबद्दल असलेला हा पुरस्कार मा. राज्यपाल यांच्या हस्ते स्विकारताना मला खूप आनंद झाला आहे. वस्तुतः मा. राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्विकारणे ही बाब सर्व शासकीय अधिकाऱ्यांसाठी अत्यंत अभिमानाची आहे. सध्या मी व्यवस्थापकीय संचालक सारथी पुणे या पदावर कार्यरत आहे. शासकीय कामकाज चांगल्या व लोकाभिमुख पद्धतीने केल्यामुळे राज्यपालांकडून मिळालेली ही शाबासकीची थाप, मला पुढील कामकाजासाठी अत्यंत प्रेरणादायी राहील.