राज्यातील हजारों पत्रकार आजारी !

 


* व्हॉईस ऑफ मिडीयाच्या तपासणीत धक्कादायक अहवाल

* पत्रकार मित्रांनो काळजी घ्या - व्हॉईस ऑफ मीडियाचे आवाहन

सोलापूर / अनिल पवार :- राज्यातील हजारों पत्रकार आजारी असल्याची माहिती पुढे आली आहे. 'व्हॉईस ऑफ मिडीया' या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या तपासणीत हा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे. या आजारी असणाऱ्या पत्रकारांची संख्या जेव्हा हजारोंच्या प्रमाणात आहे असे कळल्यावर पत्रकारीता क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

मागच्या तीन महिन्यात 'व्हॉईस ऑफ मिडीया' या पत्रकारांच्या संघटनेने राज्यभरात पत्रकारांच्या तपासणीचे कँम्प, शिबीर हे तालुका, जिल्हा, शहर या ठिकाणी आयोजित केले होते. राज्यभरात १४८ ठिकाणी या आरोग्य तपासणीचे आयोजन केले गेले होते. ज्यात प्रिंट, टीव्ही, रेडिओ, डिजिटल मीडियाच्या ७ हजार ८०० पत्रकारांची तपासणी केली गेली. यात तपासणी केलेल्या १ हजार ३२८ पत्रकारांना शुगर, २ हजार ९१२ पत्रकारांना बीपी, १ हजार २० पत्रकारांना थायरॉईड झाल्याचे आढळून आले. यात अन्य छोटे छोटे आजार असणाऱ्या पत्रकारांची संख्या ६१३ होती. ७ हजार ८०० मध्ये पाच हजाराहून अधिक आजारी असल्याचे पुढे आले आहे. या सर्व पत्रकारांना नियमित औषधी त्यांच्या नियमित तपासण्या करण्याचे काम सुरु आहे अशी माहिती 'व्हॉईस ऑफ मिडीया' या पत्रकार संघटनेचे आरोग्य विंगचे प्रमुख भीमेश मुतुला यांनी सांगितले आहे. 

जे पत्रकार आजारी आहेत, त्यांना औषध, नियमित तपासणी ज्याप्रमाणे सल्ला दिला आहे, त्याप्रमाणे केले तर दोन महिन्यात किमान ५० टक्के पत्रकारांचे आजार कमी होतील असे मत या तपासण्या करणारे डॉं. प्रमोद अनसापुरे यांनी व्यक्त केले आहे. आम्ही आरोग्याच्या उद्देशाने शासनाला अनेक वेळा उपाय, योजना सुचवल्या, त्यांना आराखडा तयार करून दिला, पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता आम्ही शासनाविरुद्ध पत्रकारांच्या आरोग्यासाठी कायदेशीर लढाई लढणार आहोत, असे 'व्हॉईस ऑफ मिडीया'चे कायदेशीर सल्लागार ॲंड. संजीवकुमार कल्लकोरी यांनी सांगितले. आम्ही पत्रकारांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची काळजी आम्ही घेऊ. आम्हाला मदत करायला शासनाला लाज वाटत असेल तर शासनाच्या भिकेची गरज नाही, असा संताप 'व्हॉईस ऑफ मिडीया'चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पत्रकारांनों तब्बेतीची काळजी घ्या असे आवाहन 'व्हॉईस ऑफ मिडीया' च्या वतीने राज्यातील सर्व पत्रकारांना करण्यात आले आहे. येत्या जानेवारी महिन्यात सर्व जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी आजारी पत्रकारांच्या तब्बेतीची फेर तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सर्व पत्रकारांसाठी नियमित कॅम्प घेतले जाणार आहेत, अशी माहिती 'व्हॉईस ऑफ मिडीया'चे राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांनी दिली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post