मानव सेवा फाउंडेशन अकोलाचा माणुसकीचा उपक्रम

* कडाक्याच्या थंडीत बेघर व निराधारांसाठी ब्लँकेट वाटप

* मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ या तत्त्वाने रेल्वे स्टेशन, बस स्थानक व जिल्हा रुग्णालय परिसरात मध्यरात्री मदतीचा हात

अकोला / प्रतिनिधी :- मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या उदात्त हेतूने कार्यरत असलेले मानव सेवा फाउंडेशन, अकोला हे संस्थान समाजातील बेघर, वयोवृद्ध, असहाय्य व अनाथ व्यक्तींसाठी सातत्याने सेवाभावी उपक्रम राबवत आहे. समाजात अनेक व्यक्तींना राहण्यासाठी निवारा नसून त्यांना उघड्यावरच जीवन व्यतीत करावे लागत आहे. अशा गरजू नागरिकांना कडाक्याच्या थंडीत उब मिळावी, या उद्देशाने संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्लँकेट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

हा उपक्रम सोमवार, 15 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12 ते 2 या वेळेत पार पडला. अकोला शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टँड तसेच सामान्य जिल्हा रुग्णालय परिसरात उघड्यावर राहणाऱ्या गरजू, निराधार आणि वयोवृद्ध नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. थंडीत रस्त्यावर झोपलेल्या नागरिकांना प्रत्यक्ष भेटून मदतीचा हात देत फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी माणुसकीचे दर्शन घडवले.


या सेवाभावी उपक्रमासाठी अविनाश कुंभार सर, सिताराम मुंदडा काका, राहुल साळुंखे, कैलास हिवराळे, रवींद्र ह. वानखडे सर, राहुल खंडाळकर, कुशल सोनाळ, राजेश धनगावकर, राहुल सागळे यांनी विशेष सेवा बजावली. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


मानव सेवा फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. नागरिकांकडून संस्थेच्या कार्याचे कौतुक होत असून, भविष्यातही अशाच माणुसकीच्या उपक्रमांद्वारे समाजातील दुर्बल घटकांसाठी सातत्याने कार्य करत राहण्याचा संकल्प फाउंडेशनतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post