* प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांनी मानले आभार
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच धावून जाणारे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जाधव यांचे नागरिकांनी कौतुक केले आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांनी प्रभागातील प्रत्येक प्रश्न स्वतःचा समजून सोडविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने आज नागरिकांचा त्यांच्यावर विशेष विश्वास बसला आहे.
गावातील गटारे, रस्त्यांची दुरवस्था, पाण्याची टंचाई, विजेच्या लाईटची अडचण, स्वच्छतेचा प्रश्न, सार्वजनिक सोयीसुविधांची उणीव यांसारख्या अनेक समस्यांवर शिवाजी जाधव यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. नागरिकांना वेळोवेळी भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेतले व ते नगर परिषदेकडे योग्य पद्धतीने मांडून तातडीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काही प्रश्न मार्गी लागले आहेत.
जाधव हे केवळ पत्रकार म्हणूनच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही लोकांसाठी झटत असल्याचे चित्र दिसत आहे. जनतेला कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी ते कायम सतर्क राहून कार्यरत असतात. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर लक्ष ठेवून त्यांनी विविध अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला. विशेषतः पाणीपुरवठा, विजेच्या तक्रारी, रस्त्यांची डागडुजी, गटारांची स्वच्छता, वीजबिलातील गोंधळ, सार्वजनिक दिव्यांची व्यवस्था याबाबत त्यांनी नगर परिषदेकडून वेळीच उपाययोजना करून घेतल्या.
याशिवाय, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, सार्वजनिक सण-उत्सव आणि आपत्कालीन परिस्थितीतही जाधव यांनी नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील रहिवासी त्यांना खऱ्या अर्थाने “नागरिकांचे आधारस्तंभ” मानत आहेत.