* 100 दिवसांचा कृती आराखड्याबाबत भेट
* भवनात मिळणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी
* लिफ्ट अभावाबाबत तत्काळ कारवाईचे आदेश
* दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याचे आदेश
कर्जत / नरेश जाधव :- कोकण विभागीय आयुक्त डॉं. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवार, 11 एप्रिल 2025 रोजी कर्जत येथील प्रशासकीय भवनाला अचानक भेट दिली. नागरिकांना प्रशासकीय इमारतीत मिळणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी तसेच त्या सुविधांचा दर्जा आणि उपलब्धता याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या "100 दिवसांचा कृती आराखडा" या विशेष उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोकण आयुक्त यांनी भेट देत पाहणी केली.
कर्जत प्रशासकीय भवनात अद्यापही लिफ्टची सुविधा उपलब्ध नाही. ही बाब अत्यंत गंभीर मानत कोकण आयुक्त डॉं. विजय सूर्यवंशी यांनी तत्काळ प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ आणि तहसीलदार डॉं. धनंजय जाधव यांना योग्य ती कारवाई करून लिफ्टसारख्या मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. याचवेळी अपंग नागरीक अमर साळोखे यांनी भवनात अपंग व्यक्तींना ये-जा करताना होणाऱ्या अडचणी लक्षात आणून दिल्या. यावर आयुक्तांनी रॅम्पची आणि इतर सुलभ प्रवेश व्यवस्था तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले.
कर्जत येथे लवकरच दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने कामकाज तत्काळ सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. ही भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या "100 दिवसांचा कृती आराखडा" या विशेष उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली. या आराखड्यात क्षेत्रीय कार्यालयांना सात प्रमुख बाबींवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यात संकेतस्थळ विकास, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणूक प्रसार आणि क्षेत्रीय भेटी यांचा समावेश आहे.
या बैठकीदरम्यान ई-ऑफिस, जिवंत सातबारा आणि विविध डिजिटल प्रकल्प राबवण्यावरही भर देण्यात आला. लवकरच कर्जत तहसीलमधील सेवा आणखी पारदर्शक, सुसज्ज आणि नागरीकाभिमुख व्हाव्यात, यासाठी प्रशासन पावले उचलत आहे. या भेटीदरम्यान प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ, तहसीलदार डॉं. धनंजय जाधव यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शिस्तबद्ध प्रशासन आणि नागरिक केंद्रित सेवा, हा शासनाचा मूळ उद्देश पुढे नेत, कोकण विभागातील शासकीय कार्यालये आगामी 100 दिवसांत नव्या जोमाने सुधारणा आणि सेवा कार्यवाही करतांना दिसतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.