* प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नवी इनिंग सुरू
* अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवळ यांचे सहकार्यांचे आश्वासन
* राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश व जनसंवाद मेळावा उत्साहात संपन्न
कर्जत / मानसी कांबळे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामुहीक राजीनामा देत रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवत महायुतीच्या उमेदवाराला कडवी झुंज दिली. निसटत्या पराभवाने खचून न जाता सुधाकर घारे पुन्हा कामाला लागले असून विधानसभा निवडणुकीपासून 'घड्याळ'ला सोडचिठ्ठी दिलेल्या सुधाकर घारे यांनी बुधवार, 9 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, नाशिक-इगतपुरीचे आमदार हिरामण कोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच हजारों कार्यकर्त्यांच्या साक्षीने घरवापसी केली. तसेच यावेळी त्यांनी शेकाप, शिवसेना (उबाठा), मनसे, शिवसेना (शिंदे) आदी विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करून घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्षप्रवेश आणि जनसंवाद मेळावा 9 एप्रिल रोजी रॉयल गार्डन, कर्जत येथे पार पडला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, नाशिक - इगतपुरीचे आमदार हिरामण कोसकर, प्रदेश सरचिटणीस दत्तात्रेय मसुरकर, अशोक भोपतराव, प्रदेश सचिव भरतभाई भगत, रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा उमाताई मुंडे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा शेकापचे नेते नारायण डामसे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कर्णूक, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, एकनाथ धुळे, रंजना धुळे, रमेश जाधव, वैशाली जाधव, अल्पेश थरकुडे, इब्राहीम करंजीकर यांच्यासह खोपोली, खालापूर, कर्जत, माथेरानचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. सुनील तटकरे यांनी आपल्या शैलीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत जोरदार फटकेबाजी केली. खा. तटकरे म्हणाले की, या निवडणुकीमध्ये तुम्हाला दुर्दैवाने पराभूत व्हावे लागले, पण पराभवाने खचून न जाता तुम्ही निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून नव्या जिद्दीने ते कामाला लागले. जिद्द न हरणारा नेता असे सुधाकर घारे हे नाव अभिमानाने घेतलं जाते, अशा शब्दांत खा. तटकरे यांनी सुधाकर घारे यांची स्तुती केली.
खा. तटकरे पुढे म्हणाले की, राजकारणात अनेक वेळा अनपेक्षित वळणे येतात. काही वेळा राजकीय बंधनांमुळे तडजोडी कराव्या लागतात, परंतु अशाही स्थितीत सुधाकर घारेंनी पराभवाने खचून न जाता पुन्हा जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले, ही बाब सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. गेल्या अनेक महिन्यांत मतदारसंघात सामान्य जनतेशी नाते जपणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेची ताकद किती मजबूत आहे, याचा प्रत्यय सतत येत आहे. असे सांगत एकजुटीचा निर्धार व्यक्त करीत कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीच्या दिशेने पावले टाकण्याचा संदेश त्यांनी दिला.
दरम्यान, यावेळी कर्जत येथील नव्या रेल्वे स्थानकाला वीर हुतात्मा भाई कोतवाल हे नाव देण्यासाठी खा. सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत-खालापूरच्या वतीने निवेदन देण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा शेकापचे नेते नारायण डामसे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच 19 वर्षे मनसे पक्षात असणाऱ्या सचिन कर्णुक यांनी देखील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, जयंत धुळे, अशोक भोपतराव, भरत भगत, सचिन कर्णुक आदींनी मनोगत व्यक्त केले.