* कर्जतमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना
* पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, सर्वत्र संतापाची लाट
* राजकिय नेत्यांकडून प्रकरण दाबण्यासाठी दबाव ?
कर्जत / नरेश जाधव :- सुसंस्कृत कर्जत तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंतःकरण हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या दोन मुलींवर स्कूल बसमधील क्लिनरने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आरोपी करण दीपक पाटील (वय 24, रा. वदप, ता. कर्जत) याच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पीडित मुलींनी त्यांच्या पालकांना सांगितले की, स्कूल बसमधील क्लिनर करण हा त्यांना बस ड्रायव्हरच्या मागील सीटवर बसायला लावत असे. त्यानंतर त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या खाजगी भागांना अश्लीलरीत्या स्पर्श करायचा. जर त्या बसायला नकार देत, तर तो त्यांना मारहाण करायचा. हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याचे मुलींच्या पालकांनी सांगितले. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, शाळा व स्कूल बस खरंच सुरक्षित आहे का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब म्हणजे आरोपीला वाचविण्यासाठी पीडित मुलींच्या पालकांवर राजकीय नेत्यांकडून दबाव टाकल्याचा आरोप पीडितांच्या आईने केला आहे. त्यामुळे संताप अधिक वाढला असून, नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
दरम्यान, पालकांकडून स्कूल बस मालकाची सुद्धा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तसेच आरोपी करण पाटील आणि ज्यांचा या प्रकरणाशी थेट व अप्रत्यक्ष संबंध आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडित मुलींच्या नातेवाईकांनी केली आहे.