नायगाव / शिवाजी पांचाळ तळणीकर :- नायगांव कन्या शाळा येथील आय सीटी प्रयोगशाळा ही विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत असून येथील मुख्याध्यापक आनंद रेनगुंटवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी राबविण्यात येत आहेत, यातील हा एक उपक्रम असल्याची माहिती अरविंद पद्मवार यांनी दिली आहे.
सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून सर्वच ठिकाणी संगणकांचा वापर होत आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी शालेय स्तरावरच्या विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाचे धडे मिळणे आवश्यक आहे. आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल. हे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद राज्य प्रकल्प संचालक यांनी आय सीटी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषद शाळांना या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा होत आहे. आधुनिक तंत्रांचा वापर करून नेहमीच्या विषय शिकविण्यासाठी व विद्यार्थ्यांची रुची वाढवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा निश्चित फायदा होईल, असे मत नांदेड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी व्यक्त केले आहे. तसेच या उपक्रमासाठी शिक्षणाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.