खोपोली / प्रतिनिधी :- श्री संत शिरोमणी सावता माळी समाज, खोपोली यांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १३७ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम शास्त्रीनगर खोपोली येथे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला. समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करीत उपस्थित मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिनकर भुजबळ तसेच युवा उद्योजक विशाल कुदळे, सामाजिक कार्यकर्ते महेश काजळे, शशिकला लोखंडे, नंदा शिंदे, अनिता म्हस्के, उषा भुजबळ, ज्योती भुजबळ आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, स्त्री-सक्षमीकरण आणि सामाजिक समतेसाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या विचारांना अनुसरून कार्य करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापिका वनिता लोखंडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर प्रमुख वक्त्यांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. संस्थेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात घेतलेल्या पुढाकारावर भर देत, नव्या पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित नागरिकांनी सावित्रीबाईंच्या कार्याला मानवंदना देत, शिक्षण आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. श्री संत शिरोमणी सावता माळी समाज, खोपोली यांनी घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. शेवटी मंगेश लोखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
