महिलांना सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पत्रकार यांनी एकत्रपणे काम करावे!


* महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे 

* अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

रायगड / प्रतिनिधी :- महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाबरोबर प्रशासन, पोलिस आणि पत्रकारांनी एकत्र येवून काम करायला हवे, असे मत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्‍या बोलत होत्या. वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या महिलांच्या कार्याची, योगदानाची दखल घेऊन, त्यांना सन्मानित करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी म्हटले.

अलिबाग येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या राजस्व सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉं. भरत बास्टेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा महिती अधिकारी मनिषा पिंगळे, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर उपस्थित होते.

महावितरण विभागात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचारी मोनिका औचटकर, कलाक्षेत्रातील आपली ओळख निर्माण करणाऱ्या अंकिता राऊत, क्रीडा क्षेत्रातील प्रियांका गुंजाळ, हळद लागवडीतून महिलांना सेंद्रीय शेतीचा मार्ग दाखविणाऱ्या मिनल राणे, तर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या रुचिका शिर्के यांचा यावेळी तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मान करण्‍यात आला.

यावेळी मार्गदर्शन करतांना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेची अध्यक्ष असल्यापासून ते आतापर्यंत या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होता आले आहे. तळागळातील कर्तृत्ववान महिलांना शोधून त्यांना उजेडामध्ये आणण्याचे काम तेजस्विनी पुरस्काराच्या माध्यमातून अलिबाग प्रेस असोसिएशन करीत आहे. यातून आपल्या समाजातील गावातील, शहरातील व आजूबाजूला असलेल्या महिलांना एक प्रेरणा देण्याचे काम पुरस्कार प्राप्त महिला करीत आहेत, असे ना. आदिती तटकरे म्हणाल्या.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग प्रेस असोसिएशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. संस्थेच्या वतीने गेल्या १८ वर्षात हा पुरस्कार मिळालेल्या महिलांवर एक पुस्तक प्रकाशित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या पुस्तकामुळे आगामी काळात जिल्ह्यातील महिलांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. आजच्या महिला या सक्षम आहेत, त्यांच्या हाती पाळण्याची दोरी आहेच पण घरातील तिजोरीची चाव्‍याही महिलांच्या हाती आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वयंपुर्णता येत आहे. महिला भगिनी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम करघत आहेत. आणि अलिबाग प्रेस असोसिएशन त्यांच्या कामावर तटस्थपणे लक्ष ठेऊन त्याची दखल घेत आहेत. हे काम कौतुकास्पद आहे असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले. 

ग्रामीण भागात अनेक महिला प्रसिध्दीपासून दूर राहून आपले काम करीत राहतात. त्यांना शोधून सन्मानित करण्याचे काम अलिबाग प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून केले जाते. या पुरस्कारामुळे चांगले काम करणाऱ्या महिलांचा सन्मान होतोच, पण त्याचवेळी इतर महिलांनाही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असते, असे मत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी व्यक्त केले.

राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात १९ हजार महिला बचत गटांना ४६० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात महिलांच्या अर्थसाक्षरतेला वाव मिळाला आहे. जिल्ह्यात ४५ हजार ६०० लखपती दीदी झाल्या असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी सांगितले.  जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा विभागाच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केले. प्रास्ताविक अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे  सुत्रसंचलन प्रफुल्ल पवार व आभार समीर मालोदे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post