* प्रशासन मात्र ढिम्म
ठाणे / अमित जाधव :- दिव्यात शासकीय नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत बियर शॉप सुरु असतात तर प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येत आहे. दारूच्या नशेमुळे भावी पिढी उद्ध्वस्त होत चालली आहे. असे असतानाही निव्वळ महसूल मिळतो म्हणून राज्य शासनाकडून स्वत:च्या नियमांनाच पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र सध्या ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील दिवा शहरात दिसून येत आहे. दिवा शहरातील बिअर शॉप राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार सुरु न राहता रात्री ११:३० ते १२ वाजेपर्यंत सुरु असतात. शासकीय नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे दिसून येत आहे. हे बियर शॉप चालक शासकीय नियम डावलून शॉप सुरु ठेवतात परिणामी रात्रीच्या वेळेस तळीरामांचे त्यामुळे दिवा शहरात मारामारी, वादविवाद सारखे अनेक प्रकार होऊ लागले आहेत. तर अनेक तळीराम बियर शॉप समोरच उघड्यावर दारू सेवन करीत असतात. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष दिसून येत असून यावर आशीर्वाद कोणाचा ? बियर शॉप धारकांशी आर्थिक लागेबांधे आहेत का ? हा सर्वसामान्य दिवेकरांना पडलेला प्रश्न आहे. सामान्यांना कायद्याचा धाक दाखवणाऱ्या पोलिस प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे.
दिवा शहरात स्टेशन परिसरासह मुख्य रस्त्यांवरील बियर शॉप उघडल्यापासून शॉप समोरच तळीराम दारू सेवन करीत असतात परिणामी शाळेत जाणारे मुले, मुली, महिला व जेष्ठ नागरिक यांना परिसरातील दारुड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील परवानाधारक बिअर शॉप्स विक्रेते वेळेचे नियम पायदळी तुडवून खुलेआम बिअर शॉप्सवर पिणाऱ्यांना जागा देऊन बियर पुरवठा करीत असतात त्यामुळे काही तरुण वर्ग दारु पिऊन रस्त्यावरच धुमाकूळ घालत शिवीगाळ करीत असतात. कुणाच्या दुकानासमोर लघुशंका करीत हुजत घालत असल्याच्या तक्रारी आढळून आल्या आहेत. सदर बियर शॉप चालकांवर कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाणार की नाही ? दारू विक्रेत्यांकडून शासकीय नियमाचे उल्लंघन होत असल्यास दारूबंदी कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल का ? असे अनेक प्रश्न सर्व सामान्य दिवेकर नागरिक उपस्थित करीत आहेत.
