* पंकज रुपवते यांच्यामार्फत काटरंग परिसरातील सोसायटी धारकांच्या पाणीटंचाईबाबत आग्रही मागणी
* खोपोली खालापूर संघर्ष समिती प्रशासनाकडे करणार यासाठी पाठपुरावा
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद विभागात काटरंग येथील आशियाना व्हिलेज, आशियाना इस्टेट, भानुप्रभा पार्क, जेसल ग्रीन भागातील प्रत्येक उन्हाळ्यात बोरिंगची पातळी कमी होत असल्याने नागरिकांचे पाण्याचे हाल होत असतात. बऱ्याच सोसायटींना पाण्याच्या टँकरने पाणी मागवावे लागत असते. नगर पालिका पाणी पुरवठा विभागामार्फत सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 6.30 ते 9 वाजेच्या दरम्यान पाणी पुरवठा होतो. बोरिंगला पाणी नसल्याने या वेळेत होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. सदर पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन नागरिकांची होणारी प्रचलंबना थांबविण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने पाणीपुरवठा हा सकाळी व संध्याकाळी किमान दोन तासाकरीता अधिक वेळ सोडल्यास नागरिकांचे जनजीवन सुरळीत राहील व त्यांना मानसिक, आर्थिक त्रास होणार नाही. यासंदर्भात त्रस्त नागरिकांच्या वतीने पंकज रुपवते यांच्यामार्फत खोपोली खालापूर संघर्ष समितीला यावर तोडगा काढण्यासाठी विनंती केली आहे.
यावर खोपोली खालापूर संघर्ष समिती प्रशासनासोबत पाठपुरावा करून सदरची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मोहन केदार यांनी स्पष्ट करतांना आपला लढा नागरिकांच्या हितासाठी आहे व त्यासाठी सर्वांच्या माध्यमातून काम सुरु ठेवू या असे सांगितले आहे.
