* प्रशासनाची उदासिनता..शाळेशेजारीच डम्पिंग ग्राउंड
* लौजी ग्रामस्थांचा भर उन्हात नगर परिषदेवर मोर्चा
* सुभाष नगर, चिंचवली, डीपी रोडकरांचाही विरोध
खोपोली / फिरोज पिंजारी :- सुभाषनगर, चिंचवली शेकीन, लव्हेज (लौजी), श्रीरामनगर, उदय विहार, डिपी रोड अशी सरासरी 10 हजार लोकवस्ती...काही अंतरावर 50 वर्ष जुनी जेसीएमएम स्कूल...अनेक धार्मिक स्थळे, नावाजलेली महिंद्रा स्टील कंपनी...डोंगर टेकड्यावरून वाहणारे नैसर्गिक धबधबे... नैसर्गिक नाले असतांना खोपोली नगर परिषदेच्या नवीन सुधारित प्रारूप विकास आराखड्यानुसार प्रभाग क्रमांक 1 मध्ये 20 एकर जागा डम्पिंग ग्राऊंडसाठी आरक्षित करण्यात आली आहे. दरम्यान, या डम्पिंग ग्राऊंडला लव्हेज, चिंचवली शेकीन, डीपी रोड, सुभाषनगर परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून डम्पिंग ग्राऊंडचे आरक्षण रद्द करण्यासाठी जनता एकटवली आहे.
डम्पिंग ग्राऊंड हटवा, लव्हेजकरांना वाचवा...डम्पिंग ग्राउंड हटवा, आरोग्य वाचवा...नाही पाहिजे, नाही पाहिजे, डम्पिंग ग्राउंड नाही पाहिजे...डम्पिंग ग्राउंडचा पाश, करील पुढच्या पिढीचा नाश...डम्पिंग ग्राउंड हटवा, पर्यावरण वाचवा...अशा घोषणांनी आसमंत दणाणून सोडत लौजीकरांनी आज डम्पिंग ग्राउंडविरोधात खोपोली नगर परिषदेवर मोर्चा नेत जोरदार निदर्शने केली. यावेळी मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थ किशोर पाटील, समीर शिंदे, वसंत पाटील, अर्जून पाटील, अल्पेश थरकुडे, अरविंद पाटील, योगेश थरकुडे, शैलेश थरकुडे, जयवंत माडपे, यशवंत थरकुडे, अनंता पाटील, गोविंद रेवले यांच्यासह खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, माजी नगरसेवक रमेश जाधव, नितीन मोरे, माजी नगरसेविका वैशाली जाधव व लौजी गावातील युवक, महिला, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लौजी येथील डम्पिंग ग्राउंडच्या आरक्षणास आमचा सक्त व प्रखर विरोध व हरकत आहे. कारण (SWMF) डम्पिंग ग्राउंडसाठी राखून ठेवलेली जागा ही निवासी वस्तीला लागून आहेत, या जमीनीच्या लगत सुभाषनगर ही 400 घरे व 3000 लोकसंख्या असलेली लोकवस्ती आहे. त्याचप्रमाणे काही अंतरावर लव्हेज (लौजी), चिंचवली शेकीन येथे 350 राहती घरे व 2500 लोकसंख्या आहे. तसेच शेजारी श्रीराम नगर, उदय विहार, सरस्वती नगर, डीपी रोड अशी 5000 हजार लोकवस्ती असलेली अनेक घरे व इमारती, नवीन निर्माण झालेल्या वसाहती आहेत. या मिळकतीच्या दक्षिणेलगत गावकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी असून प्रारूप विकास योजनेमध्ये त्या निवासी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे डम्पिंग ग्राउंड वस्तीच्या व जंगलाच्या खूप लांब ठिकाणी असावयास हवे, मात्र, सदरच्या आरक्षणापासून जंगल काही अंतरावर आहे.
आमच्या राहत्या घरांच्या लगत डम्पिंग ग्राउंड झाल्यास आमच्या गावाला नरकाचे स्वरूप प्राप्त होईल. कचरा डेपोमध्ये साठलेल्या कचऱ्यामुळे सतत पसरणारी दुर्गंधी ही नित्याची बाब होईल. तर डास, माशा, मोकाट कुत्रे, डुकरे असे नानाविध किळसवाणे प्राणी, कचरा डेपोमध्ये सतत ये-जा करणाऱ्या गाड्या यातून नेहमीच सांडणारा कचरा, घाणपाणी असेच किळसवाणे दृश्य आम्हाला व आमच्या पुढच्या पिढ्यांना कायमस्वरूपी बघावे लागेल. यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होईल, यामुळे आम्हाला आमच्याच गावात राहणे अशक्य होईल. आमच्या गावाचा विकास पूर्णपणे थांबेल या गावातील जमीन मिळकती कोणी विकसक विकासासाठी घेणार नाही, कारण कचरा डेपोचा दुर्गंध आसमंतात पसरतो. खोपोली नगर परिषद क्षेत्रामध्ये खोपोली गावात विकसन जवळपास पूर्ण झाल्याने लव्हेज, चिंचवली शेकीन गावात विकास होण्यास आता कुठे सुरुवात होत आहे, या (आरक्षण क्रमांक 51 SWMF) डम्पिंग ग्राउंडमुळे विकासाला खिळ बसेल.
ऐवढेच नव्हे तर मिळकतीचा काही भाग डोंगराला लागून आहे. इथे कचरा साठल्यास पावसाळ्यामध्ये घाण पाणी खाली वाहत येऊन त्याचा फटका गावाला बसेल. या जमीनीच्या मागे डोंगर आहे. खोपोली भागामध्ये हिवाळ्यामध्ये सकाळपासून दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत तुफान वादळी व चक्री वारा वाहत असतो, त्यामुळे कचरा व कचऱ्याचा दुर्गंध सर्व आसमंतात पसरेल.
कचरा डेपोमध्ये सतत आगी लागतात अथवा लावल्या जातात, त्यामुळे त्याची उष्णता व धूर त्याचाही 8 महिने मोठा उपद्रव आम्हाला होईल. जंगलात असल्यामुळे तेथील वृक्ष व जंगली प्राण्यांना यापासून धोका निर्माण होईल व जीवितहानी होण्याची शक्यता आहे. सदर मिळकतीमधून दोन मोठे नैसर्गिक नाले जात आहेत व हे नाले नंतर 1.5 किलोमीटरवरून वाहणाऱ्या पाताळगंगा नदीस मिळतात. पावसाळ्यामध्ये हा कचरा व याची घाण नाल्यातून वाहून नदीत जाईल व त्यामुळे नदीचे प्रदूषण होणार आहे. दरवर्षी एकदा किंवा दोनदा तरी पूर आजूबाजूच्या परिसरात येत असतो, त्यामुळे या डम्पिंग ग्राउंडचा कचरा व याची घाण पाण्याबरोबर गावात येईल.
या डम्पिंग ग्राउंड आरक्षणाला लागूनच जेसीएमएम महिंद्रा स्कूल गेल्या 50 ते 55 वर्षापासून शाळा चालवली जात आहे, यात परिसरातील 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना वेगवेगळे आजार व त्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होणार आहे. लव्हेज गावात खोपोली नगरपालिकेची वासुदेव बळवंत शाळा क्र. 8 व खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची जनता विद्यालय शाळा आहे. तसेच चिंचवली शेकीन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर नगर परिषद खोपोली शाळा क्र. 9 व सेंट मेरी इंग्लिश स्कूल या शाळा आहेत, या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होणार आहे.
तसेच या डम्पिंग ग्राउंड आरक्षणालगत अनेक वर्षापासून असलेले ऐतिहासिक पुरातन लव्हेज गावातील भवानी माता मंदिर, हनुमान मंदिर आहे. डम्पिंग ग्राउंडला लागून असलेल्या सुभाष नगर लोकवस्तीमध्ये गणपती मंदिर, शिव मंदिर, मज्जिद, अय्यप्पा मंदिर अशी वेगवेगळी धार्मिक मंदिरे आहेत. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरामध्ये श्रीराम मंदिर, श्री साईबाबा मंदिर, खंडोबा मंदिर, हनुमान मंदिर, गावदेवी मंदिर, शिव मंदिर अशी विविध मंदिरे आहेत. येथे येणाऱ्या भाविक भक्तांना या दुर्गंधीचा त्रास होणार आहे. डम्पिंग ग्राउंड आरक्षण ज्या ठिकाणी आहे, त्याला लागूनच महिंद्रा स्टील कंपनी गेल्या 60 ते 70 वर्षापासून या ठिकाणी आहे. येथे 2000 कामगार काम करतात, या कामगारांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. कंपनीमध्ये स्थानिक कामगार जास्त प्रमाणात आहेत. तसेच डम्पिंग ग्राउंड आरक्षणाच्या काही अंतरावर मध्य रेल्वेचे लव्हेज स्टेशन आहे. या ठिकाणी अनेक प्रवासी प्रवास करीत असतात. डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीमुळे त्यांच्याही आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. तसेच लगत डोंगराळ भागात दोन नैसर्गिक धबधबे आहेत, या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात, यामुळे पर्यटनावर याचा विपरीत परिणाम होणार आहे. तरी डम्पिंग ग्राउंडसाठीचे आरक्षण (रिझर्वेशन) त्वरीत रद्द करावे व त्या मिळकती निवासी करण्यासाठी राखून ठेवाव्यात, असे आवाहन नागरीकांकडून करण्यात आले आहे.



