पालघर / नरेंद्र एच. पाटील :- अरुणाचल प्रदेश येथील परशुराम कुंड येथे बालयोगी श्री सदानंद महाराज, तुंगारेश्वर पर्वत, वसई यांच्या पारायणाची सुरुवात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या दिंडीने झाली. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने, टाळ मृदूंगाच्या गजराने अवघा परिसर दुमदुमून गेला. कडाक्याच्या थंडीत मोजक्या वाचकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने पारायणाला सुरुवात करण्यात आली. 8 मार्चपर्यंत हे पारायण चालणार आहे.
1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता मुंबई - डीब्रुगड एक्स्प्रेसने निघालेले बाबांचे पारायण वाचक तीन दिवसाचा रेल्वे प्रवास करून 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता आसाम राज्यातील न्यू तीनसुखिया जंक्शनला उतरले. तेथून पुढे बसने अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड येथे पोचताना मध्यरात्री उलटली. वातावरणातील गारव्याने सर्वांना हुडहुडी भरली होती. पण बाबांच्याप्रती असलेल्या भक्तीपोटी सर्व वाचक थंडीला न जुमानता सकाळी तयार होऊन श्री ज्ञानेश्वरी पारायणास हजर राहिले. हे पाहून येथील मान्यवरही भारावले.
ग्रंथराज दिंडीसह परायणास अरुणाचल प्रदेशचे कृषिमंत्री ताबा टेडीर, चेअरमन लुपालूम करी, व्हाईस चेअरमन अचिंत्य माल्ला बुजूर बरुआ, के. पी. ग्रुपचे उपाध्यक्ष किसन पाटील, जॉईंट खजिनदार हिल्लान्ग ताजक, नूनें तयांग, कमिटी सदस्य श्याम पाटकर, चंद्रकांत कदम, ऍंड. रवींद्र लोखंडे तसेच अरुणाचल प्रदेश सरकारचे इलेक्ट्रिक बोर्डाचे डायरेकटर, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर यांनी उपस्थिती लावली होती. पारायणानंतर दुपारी राघव शास्त्री यांची भागवत कथा तसेच हरिपाठ, संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असणार आहे.
