75 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख उपअधीक्षकासह एकाला अटक

ठाणे / अमित जाधव :- ठाणे भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक यांच्यासह भुकरमापक यांना 75 हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. आरोपी लोकसेवक चांगदेव गोविंद मोहळकर (वय  39) उपअधीक्षक, वर्ग 2 रा. लोधा, कोळशेत रोड, ठाणे तसेच दुसरा आरोपी श्रीकांत विश्वास रावते (वय 43) पद- भूकरमापक, वर्ग 3 रा. स्वस्तिक पार्क, ब्रह्मांड, ठाणे यांना 75 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले.

तक्रारदार यांच्या जागेशी निगडीत लोकसेवक रावते यांनी जमीन मोजणी केलेल्या पोटविषयाची क - प्रत नकाशा करून देण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली तसेच लोकसेवक मोहोळकर उपअधीक्षक यांनी यापूर्वी एक लाख 95 हजार रुपये लाच घेतल्या बाबत दिनांक 27/02/2025 रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पडताळणी केली असता यातील तक्रारदार यांचे कडे लोकसेवक रावते यांनी 1 लाख रुपयांची मागणी  करून तडजोडअंती 75 हजार रुपयांची मागणी केल्याने तसेच लोकसेवक मोहोळकर यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांच्याकरीता लाचेच्या रकमेची मागणी करून तक्रारदार यांना लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. 

त्या अनुषंगाने 5 मार्च रोजी सापळा कारवाईदरम्यान लोकसेवा रावते यांना लाचेची रक्कम 75 हजार रुपये स्विकारताना आरोपीस सापळा लावून पथकाने रंगेहाथ पकडले असून लोकसेवक मोहोळकर यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी सापळा अधिकारी धर्मराज सोनके (पोलीस उपअधिक्षक) एसीबी ठाणे व सापळा पथक व मार्गदर्शन अधिकारी शिवराज पाटील (पोलिस अधीक्षक), सुहास शिंदे व संजय गोविलकर (अप्पर पोलीस अधीक्षक) एसीबी ठाणे यांनी कारवाई केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post