* खोपोली नगर परिषदेला लेखी निवेदन सादर
खोपोली / प्रतिनिधी :- सहाय्यक संचालक नगररचना रायगड, अलिबाग यांच्याकडून खोपोली नगरपालिकेचा नवीन प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये लव्हेज येथील सिटी सर्वे नंबर ६६६, ६६७, ६६८, ६६९, ६७०, ६७१, ६७२ व सर्वे नंबर २३ वरती या नवीन प्रारूप विकास आराखड्यामध्ये SWME सार्वजनिक उपयोगी क्षेत्र (public utility zone) डम्पिंग ग्राउंड आरक्षित करण्यात आले आहे. सदर क्षेत्र सुभाषनगर परिसराच्या अगदी लगत जोडून आहे. विचार केला असता सुभाषनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे, यामुळे येथील नागरिकांना याचा भविष्यात मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. सुभाष नगर वसाहत गेल्या अनेक वर्षापासून असून सुद्धा नगरपालिकेने अशा प्रकारचा झोन गावालगत कसा टाकला ? हा ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे.
या जागेला लागून जेसीएमएम महिंद्रा स्कूल गेल्या ५० वर्षापासून त्या ठिकाणी आहे. शाळेला लागूनच अशा प्रकारे झोन टाकल्यामुळे तेथील शाळेच्या विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. तसेच सुभाषनगर येथील नागरिकांना त्याचप्रमाणे नवीन निर्माण होणाऱ्या वसाहतीला तसेच लव्हेज गावाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे, त्यामुळे सदर जागेवरील झोन बदलून त्या ठिकाणी रहिवाशी झोन (Residential zone) करण्यात यावा, अशी मागणी खोपोली नगर परिषद वार्ड क्र. 1 चे नगरसेवक नितीन अनंता मोरे यांनी खोपोली नगर परिषदेकडे केली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, सदर मागणी जर पूर्ण झाली नाही तर आम्ही वार्ड क्र. १ चे ग्रामस्थ याबाबत न्याय मिळवण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्विकारू.
