कोकण रेल्वे मार्गांवर पनवेल ते चिपळूण ८ डब्यांची मेमू धावणार

चिपळूण / प्रतिनिधी :- होळी सणासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेमार्गांवर आणखी तीन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमध्ये पनवेल ते चिपळूण मार्गांवर ८ डब्यांची मेमू लोकल गाडी सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे केवळ होळीसाठी न सोडता ती कायमस्वरूपी करावी, अशी येथील प्रवाशांची मागणी आहे.   

होळी सणानिमित्त कोकण रेल्वेमार्गांवर तीन स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यात चिपळूण-पनवेल-चिपळूण अशी अनारक्षित मेमू विशेष गाडी असेल. चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमू विशेष चिपळूणवरून दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटून पनवेल येथे रात्री ८ वाजून २० मिनिटांनी पोहचेल. ही गाडी १३ ते १६ मार्च या कालावधीत धावेल. परतीच्या प्रवासात पनवेल-चिपळूण मार्गांवर ही गाडी पनवेलवरून रात्री ९ वाजून १० मिनिटांनी सुटून चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता पोहचेल. ही गाडी १३ ते १६ मार्च या कालावधीत धावेल. आठ डब्यांची ही गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेण हे थांबे घेणार आहे. ही रेल्वे कायम करण्याची मागणी येथील प्रवाशांची आहे.

Post a Comment

Previous Post Next Post