बॅंगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

रायगड / प्रतिनिधी :- जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी 2 मृतदेह आढळून आल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. महाड आणि पेण तालुक्यात दोन खुनाच्या घटना घडल्या असून पोलिसांकडून आता सखोल तपास करण्यात येत आहे. महाड तालुक्यातील वाळण येथील जंगल भागामध्ये एका 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. राहुल शिवाजी लाड असे या मृत युवकाचे नाव असून राहुलचा मृतदेह जंगल भागामध्ये सापडल्याने येथे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. राहुल जंगलामध्ये कशासाठी आणि का गेला होता याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र, जंगल परिसरात त्याचा मृतदेह आढळून आल्याने उलट-सुलट चर्चा होत आहेत. दुसरीकडे पेण तालुक्यात एका बॅगेत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅगेतून मृतदेह बाहेर काढला आहे. 

वाळण खुर्द येथील पोलिस पाटील दीपक भिकाराम महामुनी यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. राहुलचा मृत्यू जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झाला किंवा शिकारीला गेले असता राहुलला शिकाऱ्यांकडून गोळी लागली आहे का ? या बाजुने पोलिसांकडून तपास सुरू आहे. विशेष म्हणजे त्याच अनुषंगाने उलट-सुलट चर्चा तालुक्यात सुरू आहे. अधिक तपासासाठी राहुलचा मृतदेह हा मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे, त्यानंतरच पोलिसांकडून याची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, दुसरीकडे पेण तालुक्यातील दुरशेत जंगल भागातील रस्त्यांवर एका महिलेचा मृतदेह बॅंगेत भरुन फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बॅंगेत महिलेचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कोणीतरी बाहेरून घेऊन येऊन या परिसरात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा तपास पेण पोलिस तपास करत आहेत.

दरम्यान, काळ्या प्रवासी बॅंगेत पाण्याजवळील निर्जनस्थळी महिलेचा हा मृतदेह आढळून आला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. तसेच, हा मृतदेह तालुक्यातील आहे की इतर कोणी या ठिकाणी आणून टाकला, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post