जय महाराष्ट्र, जय मराठी

* अशी उद्घोषणा करण्याचे माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांचे आवाहन

मुंबई / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याची मराठी ही राजभाषा आहे. यामुळे १ मे १९६५ पासून दरवर्षी महाराष्ट्र दिनी, मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो. तर कवी कुसुमाग्रज यांचा २८ फेब्रुवारी हा जन्म दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आता तर भारत सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. असे सर्व असले तरी, जो पर्यंत आपण स्वतःच मराठी भाषेचा अभिमान बाळगत नाहीत, मराठीत बोलत नाहीत तोपर्यंत सर्व कायदे, नियम, दर्जा हे सर्व कागदावरच राहतील, म्हणून आजपासून आपण देशभक्तीच्या उद्घोषणा करीत असतानाच "जय महाराष्ट्र, जय मराठी" अशीही उद्घोषणा करीत जावू या, असे आवाहन माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते सानपाडा जेष्ठ नागरिक संघाच्या सकाळच्या सत्रात बोलत होते. सत्राच्या अध्यक्षस्थानी सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कदम होते.

आजच्या दिन विशेषाचे महत्व सांगताना भुजबळ म्हणाले की, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे. ते आधी मुंबई राज्याचे ४ वर्षे आणि नंतर १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने १ मे १९६० रोजी स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र राज्याचे २ वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्या या दोन्ही मुख्यमंत्री पदाच्या काळात स्थापन झालेल्या विविध संस्था, महामंडळे यांच्या पायावरच महाराष्ट्र राज्याची प्रगती होत आहे. मराठी भाषेसाठी त्यांनी दिलेले अमूल्य योगदान लक्षात घेऊन त्यांच्या आजच्या जयंती दिनापासूनच आपण "जय महाराष्ट्र, जय मराठी" ही उद्घोषणा देणे संयुक्तिक ठरेल. या त्यांच्या आवाहनानंतर उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात या कल्पनेचे स्वागत केले. मराठीबरोबरच अन्य भाषा शिकण्याचे महत्व ही त्यांनी स्वानुभवाच्या आधारे कथन केले.

अनेक पुरस्कार प्राप्त सानपाडा जेष्ठ नागरिक संघाच्या रोजच्या सकाळी होणाऱ्या सत्रात काही व्यायाम प्रकार, हास्य योग, दिन विशेष आणि त्या निमित्ताने विचार मंथन होत असते. हे सत्र संपल्यानंतर होणाऱ्या विविध उद्घोषणांनी सर्व परिसर दणाणून जात असतो. सकाळचे हे सत्र चांगलेच लोकप्रिय असून यावेळची उपस्थिती लक्षणीय असते.


Post a Comment

Previous Post Next Post