मुंबई / प्रतिनिधी :- गोरखपूर येथून जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या सीमा अजय सोनी हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात गंभीर खुलासा झाला आहे. या प्रकरणी सीमाचा भाऊ दीपक लालजी सोनी याने सायन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून तिच्या पतीवर भारतीय न्याय संहिता (IPC 302) (खुनाचा गुन्हा) अंतर्गत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
* घटनेचा तपशील :- 2 मार्च 2025 रोजी दीपक सोनी यांना अनोळखी क्रमांकावरून गोरखपूर, कवडी राम येथून फोन आला की, त्यांची बहीण सीमा अजय सोनी जळालेल्या अवस्थेत आहे. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे सीमाची स्थिती दाखवण्यात आली.
* गोरखपूर ते लखनऊ :- सीमाला गोरखपूर येथील सिकिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. पुढे, स्थिती गंभीर असल्याने तिला लखनऊ येथील जोबियन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
* लखनऊ ते मुंबई :- जोबियन हॉस्पिटलमध्ये 5 दिवस उपचारानंतरही सुधारणा न झाल्याने, तिला पुढील उपचारांसाठी मुंबईला हलविण्यात आले. प्रथम केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर जागा नसल्याचे कारण देत तिला आयटी हॉस्पिटल येथे हलविण्यात आले.
* सायन हॉस्पिटलमधील घटना :- 11 मार्च 2025 रोजी पहाटे 5:30 वाजता सीमाला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी ती जबाब देण्याच्या स्थितीत नव्हती, त्यामुळे तिच्या भावाचा दीपक लालजी सोनी याचा जबाब नोंदविण्यात आला.
* पतीच्या जबाबावर संशय :- सीमाचा पती अजय रामकिशन सोनी याने पोलिस जबाबात सांगितले की, रात्री 1 वाजता जेवण बनविण्याच्या कारणावरून वाद झाला आणि सीमाने स्वतःला पेटवून घेतले. मात्र, हा जबाब खोटा असून सत्य परिस्थिती लपवली जात असल्याचा आरोप दीपक सोनी यांनी केला आहे.
* सीमावर पूर्वी ही अत्याचार :- (मुलगी माही अजय सोनी हिची साक्ष ) सीमाची मुलगी माही हिने स्पष्ट सांगितले की, तिच्या वडिलांनी रात्री 1 ते 1: 30 वाजता दारूच्या नशेत घरी येऊन तिच्या आईला बेदम मारहाण केली.
माहीने सांगितले की, अजय सोनीने सीमाला बांबू आणि शिलाई मशीनने मारहाण केली आणि डोक्याला गंभीर इजा केली. त्यानंतर तिच्या अंगावर ऍसिड टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला.
* धमकावण्याचा प्रयत्न :- लखनऊ हॉस्पिटलमध्ये माहीला तिच्या वडिलांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी धमकावले. तिने सत्य उघड केल्यास तिला आणि तिच्या जीवाला धोका पोहोचवला जाईल, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे माही दहशतीत होती.
* दीपक सोनी यांची मागणी :- दीपक सोनी यांनी पोलिस ठाण्याकडे काही मागण्या केल्या आहेत.
- माही अजय सोनी हिचा जबाब तात्काळ नोंदवावा. माही घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित होती आणि ती संपूर्ण परिस्थितीची साक्ष देऊ शकते.
- पूर्वी नोंदवलेले जबाब तपासावेत. जर खोटे जबाब नोंदवले गेले असतील, तर त्यावर कठोर कारवाई करावी.
- अजय रामकिशन सोनीवर IPC 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करावा. सीमाच्या मृत्यूमागे पतीचाच हात असून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी.
* सायन पोलिस ठाण्याकडून झिरो एफआयआर दाखल :- सीमाच्या संशयास्पद मृत्यूबाबत सायन पोलिस ठाण्याकडे 20 मार्च रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन सायन पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पुढील कार्यवाहीसाठी गोरखपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
* कुटुंबियांची न्यायासाठी मागणी :- सीमाच्या कुटुंबीयांनी पोलिस प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. माझ्या बहिणीवर अमानुषपणे अत्याचार करून तिचा जीव घेतला गेला. दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे दीपक सोनी यांनी सांगितले.
* न्यायाची अपेक्षा :- सीमाच्या मृत्यू प्रकरणात सत्य बाहेर यावे आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. सध्या सायन पोलिसांनी तपास सुरू केला असून, दोषींना अटक होण्याची शक्यता आहे.