खोपोली, खालापूर, कर्जत येथे 'एचएसआरपी' सेंटर द्या !

* खोपोली खालापूर संघर्ष समितीची मागणी 

* नागरिकांच्या मागण्या लक्षात घेता कळंबोली येथील आरटीओ अधिकारी यांना निवेदन

* शहरी व ग्रामीण भागात याबाबत खोपोली खालापूर संघर्ष समिती करणार जनजागृती

खोपोली / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या वतीने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्याचे निर्देश दिलेले आहेत. 1 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर या नंबर प्लेट आहेत. त्यामुळे 31 मार्च 2019 पर्यंत सदर नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना 31 मार्च 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा आरटीओ (RTO) कडून दंड आकारण्यात येईल, असा इशारा परिवहन शाखेकडून देण्यात आलेला आहे. 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणीकृत वाहनांवर हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आधीच बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे या वाहनांना बसवण्याची गरज नाही.

1 एप्रिल 2019 नंतरच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविलेल्या आहेत. या विशेष प्रकारच्या अल्युमिनियमपासून बनलेल्या असून त्यावर परावर्तित रंग आणि युनिक आयडेंटीफिकेशन कोड असतो. या प्लेट्स सीसीटीव्ही कॅमेराद्वारा सहज ओळखल्या जावू शकतात. त्यामुळे वाहन चोरी आणि बनावटगिरी रोखण्यास मदत होते असे प्रादेशिक परिवहन शाखेचे म्हणणे आहे. या नवीन नंबर प्लेटसाठी दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये व GST कर, तीन चाकी वाहनासाठी 500 रुपये व GST कर, तसेच चारचाकी गाडीसाठी 745 रुपये व GST कर आकारण्यात येणार आहे. शासनाने नियुक्त केलेल्या अधिकृत फीटमेंट सेंटरवर अपॉइंटमेंट घेऊन अधिकृत विक्रेत्याकडूनच एचएसआरपी नंबर प्लेट घ्यावी, असे परिवहन शाखेने सुचवलेले आहे. सदर फिटमेंट सेंटर निश्चित करताना शासनाने नागरिकांना सोयीचे होईल असे ठिकाण देणे अत्यंत गरजेचे आहे. कर्जत व खालापूर तालुक्यासाठी पनवेल सेंटर निश्चित केले आहे. खोपोली, खालापूर, कर्जत येथील असंख्य वाहनांना यासाठी स्वतःची गाडी घेऊन पनवेल येथे जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषतः महिला वर्ग दुचाकी धारकांना सदर गाडी घेऊन जाणे जिकरीचे ठरणार आहे. यातून होणाऱ्या मानसिक त्रासासोबत अपघात होण्याचे व जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.

खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून आरटीओ (RTO) विभागास विनंती करण्यात आलेली आहे की, सदर नंबर प्लेटसाठी खोपोली, खालापूर, कर्जत या ठिकाणी सेंटर द्यावे अथवा यासाठी खोपोली, खालापूर, कर्जत येथे कॅम्प आयोजित करून सदर नंबर प्लेट बसविण्याची सुविधा करून द्यावी जेणेकरून नागरिकांना सोयीचे होईल. या मागणीचा विचार करून आरटीओ (RTO) ने नागरिकांना सहकार्य करावे. योग्य ती जनजागृती करावी. लाखोंच्या वरती असणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता यास मुदतवाढ द्यावी तसेच स्थानिक ठिकाणी कॅम्प करण्याची सुविधा द्यावी अथवा काही सेंटर्स उपलब्ध करून द्यावे, अन्यथा नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने डॉं. शेखर जांभळे यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post