* रांजणखार-डावली ग्रामस्थांचा जनआक्रोश हंडा मोर्चा
* धनदांडगे, उद्योगपतींच्या बंगल्यांना मुसळधार पाणी
* ग्रामस्थ पाण्यापासून वंचित...असा भेदभाव का ?
अलिबाग / ओमकार नागावकर :- अलिबाग तालुक्यातील रांजणखार-डावली हे गाव अलिबाग तालुक्यातील शेवटचे टोक असून गेले कित्येक वर्षे पाण्यापासून वंचित राहिले आहे. वारंवार प्रशासनाला निवेदन व प्रत्यक्ष भेटी देऊनही पाण्याचा प्रश्न अद्यापपर्यंत सुटलेला नाही व ही गावे पाण्यापासून आजपर्यंत वंचितच राहिली आहेत, त्यासाठीच आज 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे ग्रामस्थांच्या वतीने सर्वपक्षीय जनआक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला.
रांजणखार-डावली ग्रामस्थांचा पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 31 जाने 2022 रोजी जलजीवन मिशन योजना मंजूर करण्यात आली होती, परंतु त्या योजनेचे पाणी गावात पाहोचलेच नाही. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून गावात एक थेंब ही पाणी गावात पोहोचले नाही. त्या योजनेसंदर्भात प्रशासनाकडून किती दिवसांत पाणी मिळेल याबाबत कोणतीही शाश्वती नाही. सदर ठेकेदारांकडून सदर योजनेचे काम संथगतीने सुरु असून व शासनाचे धोरण प्रति माणसी 55 लि. प्रति दिन असतानाही रांजणखार-डावली ग्रामस्थांना तीन महिन्यातून एकदाही पाणी ग्रामपंचायतीला मिळत नाही.
एमआयडीसी व्यतिरिक्त गावाला पाण्याचा इतर कोणताही स्रोत उपलब्ध नाही. या योजनोचे पाणी इतर गावातील धनदांडगे, उद्योगपती यांच्या बंगल्यांना देत असून ज्या गावांसाठी ही योजना राबविण्यात आली, त्या गावांना मात्र पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. सदरील गावात 20 रुपये 20 लि. प्रमाणे ग्रामस्थांना पाणी विकत घेऊन पाण्याची तहान भागवावी लागत आहे, मग सरकारचे 'हर घर जल' धोरण गेले कुठे ? असा प्रश्न उपस्थित करीत रांजणखार-डावली ग्रामस्थांनी उग्र आंदोलन केले.