* अतिक्रमण करणाऱ्याकडून जीवाला धोका?
* पोलिस प्रशासनासह तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष ?
* वृद्धांना दमदाटी करणाऱ्याला प्रशासनाचे अभय ?
* नेरळ ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक प्रकार
कर्जत / नरेश जाधव :- महिला...आणि त्यात ही वृध्द महिला यांना अवैधरित्या अतिक्रमण करणाऱ्याकडून धमकावले जात आहे. पण ग्राम पंचायत, पंचायत समिती, तहसील व पोलिस प्रशासनाकडून याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असून या महिलांचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का ? असा प्रश्न निर्माण करणारी घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. मालकीच्या जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना प्रशासनाकडून अभय मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील कोल्हारे ग्रामपंचायतमधील धामोते येथे घडला आहे. सर्वे नंबर 50, हिस्सा नंबर 1 मधील जागेवर एका इसमाने अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले असून, संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.
जागेच्या मालक दिपाली दिलीप गंद्रे (वय 67) आणि सदर मिळकत भाडेतत्त्वावर घेतलेल्या लैला युसूफ काझी (वय 63) यांनी नेरळ पोलिस ठाणे, कोल्हारे ग्रामपंचायत तसेच कर्जत तहसील कार्यालय येथे तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्यांना दमदाटी करण्यात येत असून, बिनधास्तपणे बांधकाम सुरू आहे. या महिलांनी अतिक्रमणाविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दादागिरी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गंद्रे यांच्या मालकीच्या या जागेत गेल्या 25-30 वर्षांपासून गॅरेज सुरू आहे. मात्र, याच गॅरेजमध्ये काम करणाऱ्या इसमाला कामावरून काढल्यानंतर त्याने जाणीवपूर्वक दुकानासमोर अनधिकृत बांधकाम सुरू केले. त्यामुळे गॅरेजमध्ये येण्याचा मार्ग अडविला गेला असून, तिथे काम करणाऱ्या लोकांच्या रोजगारावर गदा येत आहे. संबंधित अतिक्रमण करणारे "बरकत बाझी" (रा. नेरळ) यांनी राजकीय लोकांची नावे घेत धमक्या दिल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. 9 फेब्रुवारी 2025 रोजी दिपाली गंद्रे यांनी याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात अर्ज दिला असून, त्यांना जीवाची भीती असल्याचे नमूद केले आहे. पीडित महिलांनी अनेक ठिकाणी तक्रार दिली असतानाही अद्याप पोलिस किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे प्रशासन अतिक्रमण करणाऱ्यांना अभय देत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अत्याचार व धमक्यांमुळे या वृद्ध अबला महिलांनी आपली जागा विकावी, असा दबाव कोणीतरी आणत आहे का ? अशीही शक्यता वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांनी गंभीर वळण घेतले होते. त्यामुळे वेळीच हस्तक्षेप न केल्यास महाराष्ट्रभर असे अतिक्रमण व धमक्यांचे प्रकार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिस प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून बेकायदेशीर बांधकाम थांबवावे आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिलांनी केली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे न्याय मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते. याबाबत कोल्हारे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधिताला नोटीस देणार असल्याचे सांगितले आहे. तर संबंधित पोलिस अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे देत एक प्रकारे दमदाटी करणाऱ्या इसमास पाठिंबाच असल्याचे दर्शविल्याने सदर अबला महिलांना न्याय मिळेल का ? याबाबत शंका उपस्थित होत आहे.