अलिबाग / प्रतिनिधी :- जापनीज इन्सेफेलाईटीस हा एक गंभीर आजार असून त्याने अपंगत्व येण्यास कारणीभूत आहे. जापनीज इन्सेफेलाईटीस या विषाणूमुळे हा आजार होतो. हा आजार संसर्गित डासामुळे पसरतो. त्यासाठी हा आजार होऊ नये म्हणून लस तयार करण्यात आली आहे. सदर लस रायगड, पुणे व परभणी या जिल्ह्यातील १ ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना १ मार्चपासून देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सोहळा नगर पालिका शाळा क्र. ६ अलिबाग येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉं. निशिकांत पाटील यांचे हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या वेळी माता बाल संगोपन अधिकारी डॉं. बावडेकर यांनी या लसीबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुरुवातीला १ ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींचे एकाच वेळी जेई लसीकरणाच्या एका डोसने लसीकरण केले जाणार आहे व नंतर नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत जेई लसीचे दोन डोस (१ ला डोस वयोगट ९ ते १२ महिने व दुसरा डोस १६ ते २४ महिने) मध्ये दिला जाणार आहे, अशी माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉं. शितल जोशी घुगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉं. किरण शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉं. अश्विनी सकपाळ, सार्वजनिक आरोग्य परिचारिका नंदिनी चव्हाण, परिसेविका उषा वावरे, तालुका आरोग्य सहायक गणेश भोबु, शाळा पर्यवेक्षक शेख सर आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता माता बाल संगोपन केंद्र, जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
