केएमसी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

खोपोली / प्रतिनिधी :- भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर जीवनाच्या सर्वांगीण विकासात मातृभाषा मराठीचे स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचे असते. म्हणून दैनंदिन जीवनात मराठी मातृभाषेचा अधिकाधिक वापर करून भाषा विकासाला गती द्यावी. श्रवण, वाचन, भाषण व लेखन ही मूलभूत भाषिक कौशल्य महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत. ज्या आधारे पुढील काळात जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उत्तम करिअर आपल्याला करता येईल. मराठी भाषेचा गौरव म्हणजे केवळ एक दिवसाचा उत्सव नव्हे तर सातत्याने भाषा विकासासाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. मराठी ज्ञानभाषा व्हावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन साहित्यिक व सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. डॉं. सुरेश देवराम वाकचौरे यांनी केले.       

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केएमसी महाविद्यालयात मराठी भाषा व साहित्य मंडळाने आयोजित केलेल्या '२७ फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन' कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबूबकर जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समितीचे उपाध्यक्ष दिलीप पोरवाल, संस्थेचे संचालक भास्करराव लांडगे, प्राचार्य डॉं. दयानंद गायकवाड, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.‌    

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती '२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन' म्हणून सर्वत्र साजरा होतो. या दिनाचे औचित्य साधून मराठी विभागाने युनिकोड लेखन कार्यशाळा, काव्यवाचन व सादरीकरण स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा हे उपक्रम आयोजित केले होते. मोठ्या संख्येने अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना पुस्तके व प्रमाणपत्र देऊन याप्रसंगी गौरविण्यात आले.

'लाभले आम्हास भाग्य बोलतो' मराठी या सुरेश भटांच्या मराठी गौरवगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सातत्याने मराठी विभागात विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मातृभाषेचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि आदर्श विद्यार्थी त्यातून घडावे, अशी या उपक्रमाची भूमिका असल्याचे मराठी विभाग प्रमुख डॉं. भाऊसाहेब नन्नवरे यांनी प्रास्ताविकातून सांगितले. प्रा. जयेश शिंदे यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे अभिवाचन केले. इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉं .जी. पी मुळीक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आयक्यूएसीचे समन्वयक डॉं. अमोल नागरगोजे, प्रा. प्रिया नेरलेकर, डॉं. प्रतिभा टेंभे, प्रा. विठ्ठल जाधव यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले. 

Post a Comment

Previous Post Next Post