लेक परक्याचे धन...

भूतलावर प्रत्येकाच्या आयुष्यातील अनेक सुखद सोहळ्यातील एक सोहळा म्हणजे "शुभ-विवाह" होय. अगदी नऊ महिने वाढलेला गोळा जेव्हा या दुनियेत येत असतो, मग तो मुलगा असो वा मुलगी संघर्ष हा कोणालाच चुकलेला नाही. मुलगा आणि मुलगी म्हटल्यावर सतत संघर्ष, सतत प्रयत्न, स्वप्नांच्या मागे धावणे, तरीही मुलगी दिवसरात्रं न थकता काम करून सर्वांना सांभाळून घेणे, सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि स्वतःला विसरून जाणे, लग्नाआधी आई वडिलांच्या धाकात लग्नानंतर नवर्‍याच्या धाकात राहणे, अगदी सर्वांच्या प्रगतीसाठी स्वतःची झीज करणे हे चालूच असते अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत.             

आई - वडील मुलीला लहानाच मोठे करतात, नको - नको ते लाड पुरवित असतात आणि आपली मुलगी वयात आली की मग आपल्या रितीरिवाज, संस्कृतीनुसार तीच लग्न करावे लागते. मग मुलगा बघण्यापासून ते अगदी ती सासरी गेल्यावर तिच्या सुखी- संसारापर्यंत काळजीत असणाऱ्या एका आई-बाबाच्या मनातील हळहळ.....!

एक बाप जेव्हा आपल्या मुलीला लहानाचे मोठे करतो तेव्हा तिच्या भविष्याची स्वप्ने रंगवताना त्याच्या मनात, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक भिती रुजलेली असते, आपण एवढ्या लाडागोडाने मुलीला वाढवले. लग्नानंतर सासरी गेली की, तीला आपल्या घरच्यांसारखी वागणूक मिळेल का ? तीला उत्तम साथीदार मिळेल का? जो तीला समजून घेईल, आपलेसे करेल, आपल्या अंगणात रुजलेले रोपटे दुसर्‍याच्या अंगणात जावून बहरेल की, कोमेजेल याची चिंता असते एका बापाला...जसे आपल्या घरी तीला प्रेम मिळाले, तसे प्रेम तीला तीच्या सासरी मिळेल का ? याची काळजी असते एका बापाला. खरचं पण बाप आपल्या मुलीची पाठवणी करतो तेव्हा आपल्या काळजाचा तुकडा दुसर्‍याच्या हाती देताना त्या बापाची काय घालमेल होते ना, ती कोणालाच समजणारी नसते.         

आईचे ते हळवे मन, डोळ्यांना सुटलेला पाझर आणि डोक्यात असंख्य विचारांचे वादळ हे सारे मनात ठेवून एक आई- वडिल आपल्या लेकीचा हात हातात देतांना सांगत असतात, जावई बापू माझ्या लेकिने माहेरी नाही कष्ट घेतले पण सासरी ती घेईल तर ती चुकेल तेव्हा तिला सांभाळून घ्या....शेवटी आईवडीलच ना ते कारण मुलगी म्हणजे आईची सावली, एकुलती एक तिची ती बाहुली...आईसारखे व्हावे असे वाटत असते प्रत्येकीला पण आईचे मागणे एकच सर्व सुख मिळो माझ्या लेकीला...!

* हेमा नंदू रांबाडे (मुर्तवडे - चिपळूण)

Post a Comment

Previous Post Next Post