* कुणाच्या आशिर्वादाने महामार्गांवर झाला कचरा डेपो ?
* गुरचरण जागेसाठी खालापूर बिडीओ साहेबांची परवानगी ?
* मोकाट जनावरांना दुखापत झाल्यास जबाबदार कौन?
* कचरा पेटविणाऱ्या ग्राम पंचायतीवर कार्रवाई होणार का ?
खालापूर / खलील सुर्वे :- खालापूर तालुक्यात रस्त्यांवर, हॉस्पिटल परिसरात, शासकीय कार्यालय, नदी, नाल्यालगत तसेच डम्पिंग ग्राऊंडमध्ये थेट कचरा जाळून टाकण्याचा सोपा मार्ग सर्वत्रच अवलंबिला जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होत आहे. या वायु प्रदुषणामुळे नागरिक व पशुपक्षी, मोकाट गुरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
खालापूर पंचायत समिती हद्दीमध्ये येणाऱ्या कलोते ग्रामपंचायत हद्दीतील जुन्या मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गालगत कचरा डेपो बनविण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर गावातील प्लास्टिक मिश्रित घनकचरा या ठिकाणी टाकला जात आहे. या कचऱ्यावर अनेक पशुपक्षी व मोकाट जनावरे ताव मारत आहेत. हा प्लास्टिक मिश्रित घनकचरा खाण्यासाठी गुरेढोरे येत असून प्लास्टिक खाताना दिसत आहेत. तसेच डम्प केलेला प्लास्टिकचा कचरा भर उन्हात पेटविला देखील जात असल्याने मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होवून नागरिक, पशुपक्षी व मोकाट जनावऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतांना दिसून येत आहे. त्यामुळे खालापूर पंचायत समिती हद्दीत प्लास्टिक कचऱ्याचे ढीग पेटविण्याचा रिवाज कायम असल्याचे दिसून येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कचरा डेपो बनविण्यात आलेली ही जागा गुरचरण असून कलोते ग्रामपंचायतीने ठराव करून खालापूर पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवून या गुरचरण जागेला तारेचे कंपाउंड मारून कचरा डेपो बनविला आहे. पुढे हे ही समजते की, सदर जागेवर कचरा डेपो बनविण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या स्तरावरून पनवानगी देण्यात आली आहे. परंतु आता प्रश्न निर्माण होतो की, गुरचरण जागा कचरा डेपोसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे का ? खालापूर पंचायत समितीच्या परवानगीनुसार गुरचरण जागेचा वापर कचरा डेपोसाठी ग्रामपंचायत करू शकते का ? एकीकडे गुरचरण जागेत कब्रस्थान व आदिवासी बांधवांसाठी स्मशानभूमीच्या परवानगीसाठी कागदपत्रे मंत्रालयात धूळखात पडले आहेत, तरी दुसरीकडे गुरचरण जागेत कचरा डेपो बिनधास्त बनविण्यात आला आहे. याबाबत ग्रामसेवक यांनी सांगितले की, सदर जागा गुरचरण नसून मसनवटा आहे. तरी गटविकास अधिकारी यांनीच याबाबत स्पष्ट करावे की, ती गुरचरण जागा आहे की, मसनवटा...वो त्या ठिकाणी कोणत्या नियमानुसार कचरा डेपो बनविण्यात आला आहे.
कचरा पेटविण्याबाबत हाळ खुर्द ग्रामपंचायत, सावरोली ग्रामपंचायत, देवन्हावे ग्रामपंचायत आणि आता कलोते ग्रामपंचायत देखील नावलौकीक करीत आहे. प्लास्टिक कचऱ्याचे डम्प केले जाणारे ढीग कधी रात्री तर कधी भर उन्हाच्या कडाक्यात पेटवत असल्याचे समोर आले आहे. मात्र, ग्राम विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यावर कोणतीच कार्रवाई करतांना दिसत नसल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
या जागेला लागून कलोते मोकाशी धरणातून येणारा भला मोठा पाण्याचा नैसर्गिक नाला आहे. या नाल्यातून वाहणारे पाणी अनेक ठिकाणी बंधारे बांधून अडविण्यात आले असून शेतीसाठी तसेच पिण्यासाठी देखील या पाण्याचा वापर होत असल्याचे समजते. एकीकडे खालापूर पंचायत समितीकडून स्वच्छतेचा व माझी वसुंधरा योजनेचा पाठ शिकवत गावोगावी जनजागृती करण्यात येते. तर दुसरीकडे अनेक ग्रामपंचायत हद्दीत पंचायत समितीच्या डोळ्यांदेखत नियमांची पायमल्ली केली जात असतांना आंधळेपणाचा सोंग घेतले जात असल्याचे पहावयास मिळत आहे. खालापूर पंचायत समितीचे ग्राम विस्तार अधिकारी तांडेल यांना कचरा जाळण्यात येणाऱ्या ठिकाण्याचे फोटो, व्हिडीओ नको पण पत्रकारांची लेखी तक्रार हवी...त्यानंतर कार्रवाईचा ते विचार करणार ? गटविकास अधिकारी साहेब हे ग्रामपंचायतीचे काम असल्याचे सांगत दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. सदर अधिकाऱ्यांची नक्की पंचायत समितीमध्ये कोणत्या व कुणाच्या कामासाठी शासनाने नियुक्ती केली आहे ? हे लोकसेवक जनतेच्या सेवेसाठी आहेत की फक्त शासनाचे मोठे पगार...शासनाच्या सर्व सोयीसुविधा...एअर कंडिशन ऑफिस... हाताखाली काम करणारे लोक आणि रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळविण्यासाठी आहेत ? हे अधिकारी पंचायत समितीमधून आपला वेळ काढून 'ऑन द स्पॉट' समक्ष जावून पाहणी का करीत नाही ? यांना जनता व पशुपक्षी, मोकाट जनावरे यांच्या जिवाची काळजी राहिलेली नाही, असेच दिसून येत आहे. नियम, कायदे फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहेत का ? यांनी मोठमोठे पगार घेवून फ्लॅट, बंगले बांधायचे आणि सर्वसामान्य नागरिकांनी रोगराईला सामोरे जावून...उपचारासाठी घरदार विकून कर्जबाजारी व्हायचे आणि भरून जायचे का ? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा बेजबाबदार, कामशून्य, कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्वरीत बदली करून यांनी केलेल्या कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केली आहे.
