अतनूर / प्रतिनिधी :- सध्या देऊळवाडी ते गुंडोपंत दापका रस्त्याचे डांबरी काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामावर अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे दिसते. देऊळवाडी ते गुंडोपंत दापका मार्गांवरील काम पाहता याची प्रचिती येते. सुरू असलेले डांबरी रस्त्याचे काम पाहून ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.
याबरोबरच रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम संपूर्ण झाले आहे. ते काम पण शासनाने ठरवून दिलेल्या परिपत्रकाप्रमाणे, कार्यारंभ आदेशाप्रमाणे व अंदाजपत्रकाप्रमाणे न करता थातूरमातूर करून निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. हे काम देखील असे तसेच केले आहे. मात्र आता ही शिल्लक राहिलेली कामे कंत्राटदार घाईघाईत करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावरील फुपुटा, माती-दगड-गोटे जशास तसेच आहेत. त्यावरच डांबराचा थर टाकला जात आहे. तेथे कामाचा कोणताही दर्जा राखला जात नाही. अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने कंत्राटदार घाईघाईत काम करीत असल्याची तक्रार आहे. या कामाची त्वरित चौकशी करण्यात यावी. तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाचा दर्जा सुधारावा, अन्यथा रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश केंद्रे-देऊळवाडीकर यांनी दिला आहे.