* सहज सेवा फाउंडेशनचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आगळावेगळा उपक्रम
* सागरिका योगिता शेखर जांभळे करणार या सातत्यपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व
खोपोली / प्रतिनिधी :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने खोपोली विभागात जन्मास येणाऱ्या कन्यारत्नास जन्म देणाऱ्या मातेचे अभिनंदन व कौतुक उपक्रमाचा 8 मार्च 2025 पासून प्रारंभ होत आहे. खोपोली हद्दीतील दवाखान्यात कन्यारत्नास जन्म देणाऱ्या मातेचे सन्मानपत्र व भेटवस्तू देवून अभिनंदन करण्यात येणार आहे.
आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. महिलांच्या जीवनात आलेल्या या नव्या सुखासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देताना मातृत्वाचा प्रत्येक क्षण आनंदाने आणि प्रेमाने भरलेला असो ही प्रार्थना देखील करण्यात येणार आहे. आई होणे म्हणजे प्रेम, त्याग आणि आनंदाचे अनोखे मिश्रण असून आयुष्यात आलेल्या या गोड कन्येसोबत प्रत्येक दिवस सुंदर आणि संस्मरणीय ठरो. याचसोबत आई म्हणून आपल्या नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देणारा हा उपक्रम समाजासाठी ऊर्जादायी ठरेल. कन्येस जन्म देणाऱ्या माता व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन व बाळाला शुभाशिर्वाद देणारे अभिनंदन पत्र व भेटवस्तू देवून सदिच्छा देण्यात येणार आहेत.
सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वदूर प्रसिद्ध असणारे समाजसेवक डॉं. शेखर जांभळे यांची लहानपणापासून वडिलांसोबात सामाजिक कार्यात सक्रिय असणारी कन्या सागरीका योगिता शेखर जांभळे या उपक्रमाचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहे. मुलगी जन्माला आली याचा आनंद व्यक्त करू या व नूतन बालकास उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देऊन आंनदोत्सव साजरा करू या, असे प्रतिपादन कन्या दिनाचे स्वागत करू या, या उपक्रमाच्या प्रमुख सागरिका योगिता शेखर जांभळे यांनी केले आहे.
