आ. महेंद्र थोरवे यांना निलंबित करा !

* परिवर्तन महाविकास आघाडीचे नेते सुधाकर घारे यांची मागणी 

कर्जत / मानसी कांबळे :- छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीत औरंगजेबाने जे कृत्य केले ते युवकांना स्फुर्ती देणारे आहे, असे वक्तव्य कर्जत-खालापूरचे आ. महेंद्र थोरवे यांनी केला आहे. या विधानाचा तीव्र निषेध करीत महापरिवर्तन आघाडीचे नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना आवाहन केले की, चुकीचा इतिहास पसरविणाऱ्या आ. महेंद्र थोरवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडावा.

छावा चित्रपट आला आहे, चांगला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास युवकांपर्यंत पोहचत आहे. परंतु आ. महेंद्र थोरवे यांनी जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीत औरंगजेबाने जे कृत्य केले ते युवकांना स्फुर्ती देणारे आहे, असे विधान आ. थोरवे यांनी केले आहे. याबाबत घारे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना व्हिडिओ दाखविण्यात आला. 2 दिवसांपूर्वी औरंगजेब याचे समर्थन करून चुकीचा इतिहास पसरविणाऱ्या अबु आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने आ. थोरवे यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करीत चुकीचा इतिहास पसरवित आहेत, या घटनेचा तीव्र निषेध करून आ. थोरवे यांच्या विरोधात परिवर्तन महाविकास आघाडीकडून कर्जत पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी सुधाकर घारे म्हणाले की, चुकीचे वक्तव्य करून टीव्ही चॅनेलवर झळकण्याचे काम आ. थोरवे करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खा. सुनिल तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यावर बोलण्याची तुमची उंची नाही. कहां राजा भोज, कहा गंगु तेली...असे वक्तव्य घारे यांनी केले आहे. कर्जत-खालापूरमध्ये बीडला ही लाजवेल असे आका आहेत. येणारे प्रोजेक्ट्स, खंडणी, पोलिसांवर कसा दबाव टाकला जात आहे. याबाबत सर्व पुरावे घेवून कर्जत-खालापूरमधील वाल्मिक कराड शोधून लवकरच पत्रकार परिषद घेतली जाईल, असे ही सुधाकर घारे यांनी सांगितले.

* कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव द्या  :-

कर्जत-पनवेल मार्गांवर लोकल रेल्वेचे काम प्रगतीपथावर आहे. या नव्या कॉरिडोरमुळे कर्जत शहर व तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल. तरी मुंबई-पनवेल कर्जत सब कॉरिडोर रेल्वे लाईन मार्गांवर होत असलेल्या नविन कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महापरिवर्तन आघाडीचे नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केली. 

* परिवर्तन महाविकास आघाडीकडून पोलिसांना निवेदन :- 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीत औरंगजेबाने जे कृत्य केले ते युवकांना स्फुर्ती देणारे आहे, असे वक्तव्य कर्जत-खालापूरचे आ. महेंद्र थोरवे यांनी केले आहे. तरी या प्रकरणी परिवर्तन महाविकास आघाडीकडून कर्जत पोलिस स्टेशनमध्ये आ. महेंद्र थोरवे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post