कोल्हापूर / किशोर जासूद :- हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या (MH 25, 8067) इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने एका वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता माळभाग हेरले इंडिया वॉशिंग सेंटर येथे घडली.
दत्तात्रय शंकर कदम (वय वर्ष 75) असे मृत या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, इनोव्हा गाडी सांगलीकडून कोल्हापूरच्या दिशेने होती. दरम्यान, याचवेळी दत्तात्रय कदम हे आपल्या घरी रस्ता ओलांडून जात असताना समोरून येणाऱ्या इनोव्हा गाडीने धडक दिल्याने कदम यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी हातकणंगले पोलिस यांनी पाहणी करून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दत्तात्रय कदम यांच्या अपघाती मृत्यूने हेरले गावात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची रात्री 8 वाजता हातकणंगले पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हातकणंगले पोलिस करीत आहेत.
