खोपोली / प्रतिनिधी :- खोपोलीच्या समृद्ध वारशाचा दस्तऐवज ठरणाऱ्या "हा पहा माझा गाव खोपोली" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लोहाणा महाजनवाडी सभागृहात उत्साहात पार पडला. ज्येष्ठ विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यां मीनाताई बाळकृष्ण बाम यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन प. पु. स्वामी मेधजानंदजी (चिन्मय मिशन) यांच्या हस्ते करण्यात आले.
* इतिहासाचा अमूल्य ठेवा :-
खोपोलीच्या जडणघडणीचा सखोल अभ्यास, ऐतिहासिक संदर्भ, पुरावे आणि समकालीन व्यक्तींच्या आठवणींवर आधारित हे पुस्तक नव्या पिढीला शहराचा वैभवशाली इतिहास समजून घेण्यास मदत करेल.
* सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती :-
या सोहळ्यास साहित्यिक लेखिका उज्वला दिघे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, वसंत मेमोरियल स्कूलचे संस्थापक उल्हासराव देशमुख, ज्येष्ठ पत्रकार सुनील भालेराव, अशोक पाटणकर, प्रकाश महाडीक, उद्योजक दीपक कुंभार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
* खोपोलीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत :-
प. पु. स्वामी मेधजानंदजी यांनी पुस्तकाचे कौतुक करीत "खोपोलीच्या ऐतिहासिक दस्तऐवजीकरणाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे" असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनीही पुस्तकाच्या ऐतिहासिक महत्त्वावर भर देत मीनाताई बाळकृष्ण बाम यांच्या परिश्रमांचे कौतुक केले.
* खोपोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :-
या प्रकाशन सोहळ्याला स्थानिक नागरिक, अभ्यासक आणि इतिहासप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खोपोलीचा गतकाळ आणि समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव प्रयत्न यशस्वी ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
