* येणाऱ्या पिढ्या वाचवायच्या असतील तर आधी कोकण वाचवा - पांडुरंग धुमक
* जमिनी विकून नोकरी करण्यापेक्षा आहे त्याच जमिनी वाचवून उद्योग धंदे उभारा
कोकण / दिपक कारकर :- कोकण प्रांतात सद्यस्थितीत पाहता मोठ्या प्रमाणात समाज बांधव, आपल्या घर शेजारी व पडीक जमिनी परप्रांतीय दलालांना विकत आहेत. जमिनी विकून नोकरी करण्यापेक्षा, त्याच जमिनी वाचवून उद्योग धंदे उभारा. आजची पिढी ही खूप भाग्यवान आहे. आजच्या पिढीला सगळे आयते मिळाले आहे. कोणते कष्ट करायचे नाहीत किंवा ना अजून काही. पण येणाऱ्या पिढीला मात्र खूप संघर्ष करावा लागणार आहे. आज आपल्या गावात, आपल्या भागात आपणच परके होत चाललो आहोत, परप्रांतीयांना आपल्या जमिनी विकून मोकळे झालोत. आज अर्ध कोकण हे आपणच विकून टाकलेले आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे. गावोगावी यावर जनजागृती करून देखील तितकेसे परिवर्तन होताना दिसत नाही. आता कोकणात सर्वत्र शिमगोत्सव सुरु आहे. दरम्यान, बारमाही मुंबईत नोकरी, वास्तव्य असणारे अनेक कोकणकर गावी जात असतात.
आपणच आपली मानसिकता बनवून घेतली आहे की, मुलाला मुंबईला नोकरी पाहिजे. दहावी-बारावी झाली की, बॅंग भरून मुंबई गाठायची. कोकणातले सुखी जीवन सोडून धकाधकीच्या जीवनात जायचे. आपण ठरवले आहे की, मुलगा मुंबईला असेल तरंच लग्नाला मुलगी देणार. मुंबईला नोकरी पाहिजे तरच लग्न करणार. भलेही मुलगा तिथे लोकलचे धक्के खाऊ देत. पण गावातील शेतकरी नवरा नको.
आज जर आपण आपल्या गावात राहून उद्योग सुरू केले तर बाहेर नोकरी करण्याचीही गरज नाही. आपला ग्रामीण भाग निसर्ग संपन्न आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. त्याचा आपण कधी वापर करणार. पर्यावरणपूरक उद्योग धंदे सुरू करून आपण रोजगार निर्माण केला पाहिजे. अजून किती दिवस दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणार आहोत. आपणही दुसऱ्यांना रोजगार देणारे बनले पाहिजे. आपल्या गावाला तरुणांची गरज आहे. येथे तरुण राहिले पाहिजेत. तरच गावाचा विकास करता येईल.
चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र पांडुरंग गु. धुमक गावी असताना मागील (२०२४) वर्षात जून / जुलै महिन्यात आपल्या मालकीची असणाऱ्या व शेती न होणाऱ्या जागेत काजू झाडे लागवड केली. त्यातील बहुतांशी झाडे वाढली असून अनेक काजू फळे निर्मित झाली आहेत. कोकणी माणसाने गावाच्या मातीपासून कितीही दूर असलो तरी गावाच्या मातीशी नाळ आपली कायम जोडलेली असावी, त्या कर्मभूमीत अनेक बागायती पिके घ्यावीत भविष्यात त्याचा आपल्याला फायदा आहे. आजूबाजूच्या गावांत जमिनी विकणे प्रमाण अधिकच वाढले असून याचा परिणाम हानिकारक आहे. हे आपण ओळखून निसर्गावर प्रेम करीत आपण अशी उत्पादन असणारी बियाणे यांची लागवड करावी. यामध्येच खूप समाधानकारक सुख आहे.
"तुज आहे तुझ्या पाशी पण वेड्या तु जागा चुकलाशी" या प्रमाणेच कोकण भुमिपुत्रांचे झाले आहे. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यामधील गावा-गावात, वाडी-वाडीपर्यंत नागरिकांना भेडसावणार्या प्रश्नांवर सरकारने, सर्व राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन, येथील जनतेच्या हितासाठी एकत्रित येऊन, या सर्व अडचणी दूर करणे काळाची गरज आहे. वेळ न दडवता आतापासूनच अंमलबजावणीला सुरुवात व्हायला पाहिजे. नाही तर उद्या उशिर झालेला असेल. अशी परिस्थिती निर्माण झाली तरच शहराकडे जाणारे नागरिक थांबतील व छोटी-मोठी गावे, वाड्या हे सर्व ठिकतील, अन्यथा पुढील येणारा काळ खूप कठीण असेल हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही. तेव्हा कोकणातील तरुणांनो जागे व्हा...आपल्या जमिनी न विकता विकसित करा. आपली मानसिकता बदलून योग्य मार्गदर्शन घ्या. स्वंयरोजगाराचे हजारो प्रकल्प उभे कसे करता येतील व स्थानिकांना रोजगार कसे उपलब्ध होतील याकडे लक्ष दया.प्रकल्प उभारणीसाठी योग्य प्रशिक्षण घ्या. निर्माण होणाऱ्या अनेक अडचणी संघटीतपणे सोडण्यासाठी एकत्र या. हापूस आंबा, कृषी उत्पादने, पर्यटन, फलोद्यान आदी संघटीत मार्केटिंग करा. त्यासाठी व्यावसायिक संघटना निर्माण करा. पुढील १५-२० वर्षांत कोकण जागतिक दर्जाचे आर्थिक विकासाचे केंद्र कसे करता येईल यासाठी प्रमाणिक प्रयत्न करा. कोकणाता नद्या, निसर्ग, धबधबे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विविध तीर्थक्षेत्र असल्याने पर्यटकांना आकर्षित करणे होते आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करा. मत्स्योद्योग, शेती, पर्यटन, फलोद्यान इ. क्षेत्रात कोकण जागतिक स्तरावर जाणे सोपे आहे. गरज आहे ती तुमच्या प्रमाणिक प्रयत्नांची. तुम्ही कोकण भुमिपुत्र आहात...भुमिपुत्र राहा...नाही तर उद्या आपल्याला आपल्याच गावात, वाडीत पाहुणे व्हावे लागेल. तेव्हा तरुण-तरुणींनो पुन्हा खेड्याकडे चला...आधुनिक शेती, व्यवसाय, स्वंयरोजगार करा.आपले कोकण समृद्ध करा, असे आवाहन पांडुरंग धुमक यांनी केले आहे.
