खालापूर / प्रतिनिधी :- सालाबादाप्रमाणे वनवे निंबोडे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन होळीच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी खालापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, गटनेते किशोर पवार, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर माने, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानू मिसाळ, पोलिस पाटील मनोज पारठे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पारठे, माजी उपनगराध्यक्षा संध्या मगर, हर्षदा उतेकर, व्यसनमुक्ती संघटना अध्यक्ष हभप उद्धव घोलप, शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष विचारे सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर ईशस्तवन व स्वागत गीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी रोशना मोडवे होत्या. त्यानंतर प्रस्ताविक मुख्याध्यापक दासरे सर यांनी केले. पत्रकार सुधीर माने व माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक हेमचंद्र पारंगे यांनी या स्नेहसंमेलनाबाबत व शालेय मुलांच्या प्रगतीबाबत शिक्षक वर्गाचे कौतुक केले. विचारे सर यांनी देखील या शाळेचे कौतुक करून मुलांना शिक्षणाबरोबर अशा प्रकारच्या ज्ञानाची गरज आहे, असे सांगितले. नगराध्यक्षा रोशना मोडवे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशगीताने झाली. त्यानंतर प्रिया भऊड हिने चंद्रालावणी सादर केली. त्यानंतर ग्रुप नृत्यात मुलामुलींनी विठू माऊली व संत गोरा कुंभार यांच्या भक्तीचे नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात वणवे गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष पारठे, शांताराम पारठे, संदीप पवार, निंबोडे येथील नाथा पवार, किशोर गायकवाड तसेच दोन्ही गावातील महिला व नागरिक उपस्थित होते.
