* शासनाकडून मोफत मिळणाऱ्या रेकॉर्ड बुकसाठी भरावे लागतील 350 रुपये
खोपोली / सचिन यादव :- खोपोली नगर परिषद हद्दीतील बचत गटांना शासनाकडून मोफत देण्यात येणारे रजिस्टर बुक अनेक महिने झाले येत नसल्याने सर्व महिला बचत गटांची गळचेपी होत असून खाजगी स्तरावर किमान 350 रुपये देऊन हे रजिस्टर विकत घ्यावे लागणार आहे. किमान 400 च्या आसपास खोपोली नगरपालिका हद्दीत बचत गट आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणासाठी शासनाने महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आर्थिक कर्ज मिळवून देऊन विविध व्यवसाय करून आज महिला बचत गटांच्या माध्यमातून पुढे येत आहेत.
महिला बचत गटांसाठी आवश्यक असणारे रजिस्टर बुक हे शासन मोफत वाटप करते. याच्या नोंदीतून बचत गटांच्या सर्व व्यवहारांची माहिती मिळते. बँक कर्ज देते पण काही महिने शासनाकडून सदर रजिस्टर आलेच नसल्याचे खोपोली नगर पालिकेचे महिला बचत गट अधिकारी सांगत आहेत. यामुळे या बचत गटांना खाजगी स्वरूपात किमान 350 रुपये भरून हे रजिस्टर घ्यावे लागणार आहे. गरीब महिला बचत गटांना ही रक्कम सुद्धा जास्त आहे. मोफत असणाऱ्या रजिस्टरसाठी आता 350 रुपये मोजावे लागणार आहेत. 400 बचत गट धरले तरी ही रक्कम खूप मोठी आहे.
खोपोली नगर परिषदेचे महिला बचत गटाचे डिपार्टमेंट अधिकारी पंकज खोत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही सदर बाब खरी असल्याचे सांगून सरकारकडून अनेक महिने झालेत रजिस्टर वही आली नसल्याचे सांगत आम्ही वारंवार मागणी करीत आहोत, पण रजिस्टर येत नसल्याने महिला बचत गटांची गैरसोय होत आहे. सरकारने त्वरित सदर रजिस्टर पुरविण्याची विनंती त्यांनी केली आहे.
खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी त्वरित लक्ष देऊन सदर रजिस्टर शासनाकडून मोफत कसे येतील यासाठी प्रयत्नशील राहून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी समस्त महिला बचत गटांकडून मागणी होत आहे.
