* नियमित कर्मचाऱ्यावर केली लगेच कारवाई
* कंत्राटी कर्मचाऱ्यांवर मात्र विशेष मेहेरबानी
कर्जत / विशेष प्रतिनिधी :- रायगड जिल्हा परिषदेमध्ये पैशांचा अपहार केला म्हणून काही कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. पण त्याच जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे काम करणारा कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रवीण भोईरने प्रधानमंत्री मातृत्व वंदना (PMMVY) योजनेचे काम वर्षानुवर्षे केले नाही आणि अनेक गोरगरीब आदिवासी, अनुसूचित जातीजमातीच्या महिलांना योजनेच्या आर्थिक लाभापासून वंचित ठेवले आहे. हे माहितीच्या अधिकारात उघड केल्यानंतर सुद्धा या कर्मचाऱ्यावर अजूनपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही. या कर्मचाऱ्याने वर्षानुवर्षे खोटी फिरती बिल देऊन शासनाची फसवणूक करून शासकीय निधीचा अपहार केला आहे. कंत्राटी लेखापाल अनिता महाडिक यांनी सुद्धा खोटी फिरती बिल घेऊन शासकीय निधीचा अपहार केल्याचे पुरावे असून पण काहीच कारवाई केली नाही. त्यातच तालुका समूह संघटक शितल चौधरी यांनी प्रधानमंत्री मातृत्व वंदना (PMMVY) योजनेची खोटी आकडेवारी तयार करून खोटे शासकीय कागदपत्रे तयार केली आहेत. दिलेली माहिती कोणत्या कागदपत्रांवरून तयार केली आहे हे माहितीच्या अधिकारात मागितल्यावर त्याची माहिती अजूनपर्यंत कर्जत तालुका आरोग्य विभागाने दिली नाही, असा आरोप न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव व आदिवासी समाज कार्यकर्त्या सुचिता लोहोकरे यांनी दिला आहे.
या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पण आरोग्य खात्याकडून या तिन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई करायचे सोडून चौकशी चालू आहे असे मागील अनेक महिन्यापासून सांगून या तिन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांची साथ मिळत असून त्यांना वाचविण्यासाठी कोणती अदृष्य शक्ती काम करीत आहे हे कळणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे.
एकाच जिल्हा परिषदेमध्ये शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या नियमित कर्मचाऱ्यांसाठी एक न्याय आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दुसरा न्याय का ? असा सवाल जनता करीत आहे. आरोग्य विभागातील या तिन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून प्रधानमंत्री मातृत्व वंदना (PMMVY) योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी समाज कार्यकर्त्या सुचिता लोहोकरे सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
याच प्रकरणात पत्रकार राजेंद्र जाधव यांनी सुद्धा अनेकवेळा जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली आहे. पण या तक्रारीची कोणतीच दखल अजून आरोग्य विभागाने घेतलेली नाही. म्हणून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रमोशन देऊ नये, पर्मनंट करू नये किंवा कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर पुन्हा नियुक्ती देऊ नये असे पत्र पत्रकार राजेंद्र जाधव यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. वंचित महिलांना न्याय मिळावा आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी पत्रकार राजेंद्र जाधव हे पुढील काही दिवसांत पुन्हा उपोषण व मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती आंदोलकांकडून देण्यात आली.
