मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर नवीन बोगद्यामध्ये लोखंडी केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग

* सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र ट्रकचे टायर, केबिन जळून खाक

खोपोली / खलील सुर्वे :- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्सिट नवीन बोगद्यामध्ये रात्रीच्या सुमारास मुंबई लाईनवर लोखंडी केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागण्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून  ट्रकचे टायर, केबिन जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिस यंत्रणा बोरघाट, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स आणि खोपोली नगर पालिका अग्निशमन दल यांनी घटनास्थळी पोचून जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले व आग विझवून अपघातग्रस्त ट्रक (क्र. MH 43 BX 7967) घटनास्थळावरून क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती, ट्रकला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ट्रकच्या केबलला लागलेल्या आगीमुळे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने अंधारात काहीच दिसत नव्हते. बोगद्यातील इतर वाहनातील प्रवाशांना श्वसनास त्रास जाणवल्याने बोगद्याच्या बाहेर काढण्यात आले होते. मुंबईकडे जाणारी वाहतूक संपूर्णपणे खोळंबली होती. हीच घटना जर बोगद्याच्या मध्यभागी अर्थात आत घडली असती तर परिस्थिती अजून भयानक असती, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. सर्वच यंत्रणांनी आग विझविण्यासोबत इतर वाहनातील प्रवाशांना सुरक्षितपणे धुरापासून श्वसनास त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post