अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा

* सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण 

मुंबई / प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच देवगिरी बंगला गाठला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे. मी त्यांचा राजीनामा स्विकारला असून, तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठविला आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला नाही तर सभागृहाचे कामकाज रोखू, असा इशारा विरोधकांनी दिला होता.

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी अद्याप फरार आहे. 27 फेब्रुवारी रोजी, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने बीड जिल्हा न्यायालयात सुमारे 1200 पानांचे आरोपपत्र सादर केले, ज्यामध्ये देशमुख यांच्या हत्येचा आणि त्या संबंधित दोन प्रकरणांचा समावेश आहे. बीडमधील केज पोलिस ठाण्यात सरपंच देशमुख यांची हत्या, आवदा कंपनीला खंडणी मागण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post