'महात्मा बसवेश्वर : कृतीतून प्रगतीकडे' या पुस्तकाचे प्रकाशन

खोपोली / दिनकर भुजबळ :- मानवाच्या सर्वांगीण विकासाकरीता निरंतन अशी मूल्ये बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी आपल्या आचरण व कृतीतून समाजाला दिली. त्यांचे मौलिक तत्त्वज्ञान, जीवन विचार व‌ विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञानाची ओळख समाजाला करून देण्याच्या उद्देशाने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या खजिनदार कवयित्री रेखा कोरे यांनी लिहिलेल्या 'महात्मा बसवेश्वर : कृतीतून प्रगतीकडे' या पुस्तकाचा शानदार प्रकाशन सोहळा खोपोलीत मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार हे होते. याप्रसंगी ‌सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सुभाष सोनवणे, कोकण विभागाचे उपायुक्त गणेश शेटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉं. जगन्नाथ विरकर, सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त, जी. एस. टी. अविनाश पाटणे, उद्योजक सुहास कोरे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, वसंत देशमुख मेमोरिअल स्कूलचे अध्यक्ष उल्हासराव देशमुख, माजी नगरसेवक मोहन औसरमल,  किशोर पानसरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, रसिक श्रोते, निमंत्रित, मित्रपरिवार व पत्रकार याप्रसंगी उपस्थित होते.  

अनघा प्रकाशन, ठाणे यांनी देखण्या स्वरूपात प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या निर्मिती मागची भूमिका प्रकाशक अमोल नाले यांनी प्रास्ताविकातून मांडली.‌ मौलिक कार्य केलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या जीवन कार्याचा खूप अभ्यासपूर्ण व वस्तुनिष्ठ असा अभ्यास रेखा कोरे यांनी केला. वैचारिक साहित्य प्रकारातील एक मौलिक ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचला आहे, अशी भावना प्रकाशक नाले यांनी व्यक्त केली. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.‌        

वीरशैव लिंगायत समाजाला उत्तम अशा मार्गदर्शक शिवपंथाची ओळख व्हावी, या उद्देशाने साध्या सोप्या भाषेत मी लेखन करून महात्मा बसवेश्वरांचे जीवन आणि कार्य पुस्तकाच्या रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, अशी भावना लेखिका रेखा कोरे यांनी व्यक्त केली. समाजातील नव्या पिढीला महात्मा बसवेश्वरांचे जीवन आणि कार्य कळावे. ते त्यांनी आत्मसात करून आपल्या जीवनाची योग्य वाटचाल करावी, ही माझ्या ग्रंथ लेखनाची भूमिका आहे. गेली चार ते पाच वर्ष वेगळ्या ठिकाणावरून संदर्भ शोधून अनेक मान्यवरांशी चर्चा करून ग्रंथ लेखनाचे कार्य आपण करू शकलो. त्यासाठी लिंगायत समाजातील अनेक मान्यवरांची मदत आपल्याला झाली, असे त्या म्हणाल्या.       

प्रतिकूल परिस्थितीत महात्मा बसवेश्वरांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा याबाबत जागृती घडविण्याचा प्रयत्न केला आणि समता, न्याय, बंधूता ही मूल्य रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही शिकवण साध्या सोप्या शब्दांत रेखा कोरे यांनी या पुस्तकातून मांडली आहे, अशी निरीक्षण कोकण विभागाचे उपायुक्त गणेश शेटे यांनी व्यक्त केली. सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सुभाष सोनवणे, सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त (जीएसटी) अविनाश पाटणे, उद्योजक सुहास कोरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉं. जगन्नाथ वीरकर यांचीही यावेळी भाषणे झाली. सर्व मान्यवर पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान यावेळी करण्यात आला.    

एका महान क्रांतिकारकांच्या धार्मिक, सामाजिक, भाषिक, आर्थिक, राजकीय विचारांचा सोप्या शब्दात मागोवा घेऊन एक समर्थ असा विचार या ग्रंथाच्या रूपाने लिंगायत समाजातील बंधू-भगिनींना लेखिका रेखा कोरे यांनी दिला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा ग्रंथ मौलिक ठरतो. आपण सर्वांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा आणि त्याचे आचरण जीवनात करावे. त्यातून योग्य ते संस्कार आपल्याला नव्या पिढीवर करता येतील अशी प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार यांनी व्यक्त केले. एक मौलिक ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित सर्व साहित्य रसिकांनी रेखा कोरे यांचे अभिनंदन करून पुढील लेखन कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.     

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून अनेकांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली आहे. रेखा कोरे यांनी आत्तापर्यंत लिहिलेले कवितासंग्रह, कथासंग्रह व आता या चरित्रग्रंथामुळे मराठी साहित्यात मोलाची भर पडेल, असा विश्वास कोकण मराठी साहित्य परिषद, खोपोली शाखेच्या अध्यक्षा उज्वला दिघे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. 'कोमसाप'च्या बालविभागाचे सदस्य व आता भारतीय नौदलात कमांडर पदावर कार्यरत असलेले आशिष अण्णासाहेब गोरे यांच्या नौदलातील कार्याचा गौरव म्हणून 'कोमसाप' तर्फे त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.‌ आसावरी कोरे, मीनल आशिष कोरे, कमांडर आशिष कोरे यांनी रेखा कोरे यांच्या लेखन कार्याबद्दलच्या आठवणी सांगून आपली भावना व्यक्त केली.   

दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन व गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जयश्री पोळ, मधुमिता पाटील व शीतल आहेर यांनी ईशस्तवन सादर केले. रेखा कोरे यांनी लिहिलेल्या महात्मा बसवेश्वर यांचा पाळणा सुप्रिया मेहेंदळे यांनी सादर केला. डॉं. गणपती मुळीक यांनी श्री गणेश स्तुती गीत सादर केले. नरेंद्र हार्डीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉं. भाऊसाहेब नन्नवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सेवानिवृत्त उपप्राचार्य अण्णासाहेब कोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व साहित्य रसिकांना 'महात्मा बसवेश्वर : कृतीतून प्रगतीकडे' या ग्रंथाची प्रत भेट म्हणून देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post