ठाणे / अमित जाधव :- मुंब्रा पोलिस ठाणे येथे 10 फेब्रुवारी 2025 रोजी एक महिला फिर्यादी यांना आरोपीत यांनी टेलिग्रामवर मेसेज करून गुगलवर जावून विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना रेटिंग रिव्ह्यू आणि कमेंट करण्याचे टास्क देऊन पैसे कमविण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांची चाळीस हजार रुपयांची फसवणूक केली होती. मुंब्रा पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक 269/ 2025 कलम 319 (2) 318 (4) बी. एन. एस. सह कलम 66 क, ड आयटीआय अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नमूद गुन्ह्याच्या तपासात मुंब्रा पोलिस स्टेशनच्या सायबर पथकाने नमूद गुन्ह्यात वापरण्यात आलेले टेलिग्राम आयडी यांची माहिती प्राप्त करून त्याचे आयपीडीआर तसेच नमूद गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या अकाउंटची माहिती प्राप्त करून त्यात रजिस्टर असलेले मोबाईल नंबर यांचे सीडीआर, आयपीडीआर तसेच रजिस्टर ईमेल आयडी यांचे आयपीडीआरबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून मुंबईतील कुर्ला पश्चिम बुद्ध कॉलनी येथे जावून छापा टाकला असता सदर ठिकाणी चार आरोपी मिळून आले व त्यांच्या ताब्यातून 7 मोबाईल्स, 37 एटीएम कार्ड, 36 चेक बुक, 3 लॅपटॉप, 3 पासबुक, 16 सिम कार्ड तसेच इतर साहित्य मिळून आले असून चारही आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली. सदर आरोपींनी व त्यांचे साथीदार यांनी टेलिग्रामद्वारे लोकांना टास्क देऊन सायबर फ्रॉड करीत असल्याचे मान्य केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपी यांना रिमांडकामी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.