* साताऱ्यातील जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश
* आरपीआयच्या संघर्षाने पाच दिवसांतच यश
* जमिनीचा ताबा मिळवत शेतकऱ्याचा विजय!
वावोशी-खालापूर / जतीन मोरे :- सातारा जिल्ह्यातील चिमणगाव येथे झालेल्या कोट्यवधींच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा पर्दाफाश करीत आरपीआयने लढा देत शेतकऱ्याला जमीन मिळवून दिली आहे. दाखविली एक जमीन आणि विकली दुसरी, अशा पद्धतीने शंकर घाडगे या शेतकऱ्याची मोठी फसवणूक झाली होती. मात्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार कांबळे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या पाच दिवसांतच घाडगे यांना त्यांच्या जमिनीचा ताबा मिळाला आहे.
शेतकरी शंकर घाडगे (वय ७४) यांनी २०१६ मध्ये संभाजी भागडे यांच्याकडून ठरावीक जमिनीचा करार करून २.५० लाख रुपये दिले होते. मात्र, करारात नमूद केलेली जमीन न देता दुसऱ्या भूखंड दिला गेला. घाडगे यांनी न्यायासाठी प्रयत्न केला असता त्यांच्यावर स्थानिक गुंड व राजकीय नेत्यांनी दबाव टाकला. या अन्यायाविरोधात आरपीआय श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार कांबळे यांनी पोलिस अधीक्षक, सातारा जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिले.
या निवेदनात त्यांनी इशारा दिला की, शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही. जर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. या इशाऱ्यानंतर प्रशासन तातडीने हलले आणि केवळ पाच दिवसांतच पिडीत शेतकरी शंकर घाडगे यांना त्यांच्या जमिनीचा ताबा मिळवून देण्यात आला. यापुढे शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आरपीआय शेवटपर्यंत लढेल. प्रदेश सचिव तुषार कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्याय मिळवून देण्याचा शब्द पाळला. या प्रकरणात आरपीआयचे सातारा तालुका अध्यक्ष आप्पा तुपे, श्रमिक ब्रिगेड कोरेगाव तालुका अध्यक्ष दत्ता सावंत, संतोष घाडगे, राहूल मंगले आदी कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
साताऱ्यातील हे प्रकरण म्हणजे जमिनीच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरव्यवहारावर कठोर कारवाईची गरज दर्शवते. आरपीआयच्या तडफदार भूमिकेमुळे शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे, मात्र भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासन किती कठोर भूमिका घेते, याकडे साताऱ्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.