* अबब...खोपोली नगरपालिका हद्दीत पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत मिक्स होत आहे सांडपाणी
* श्री विरेश्वर मंदिर तलावात जलवाहिनीतून येणाऱ्या दूषित पाणी
* नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत खोपोली-खालापूर संघर्ष समिती आक्रमक
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगरपालिका हद्दीतील शंकर मंदिर तलाव येथे पाताळगंगा नदीमधून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमध्ये गगनगिरी मठाच्या बाजूला असणाऱ्या जलवाहिनीत विरेश्वर व लेक व्यूह बिल्डिंगच्या मागील बाजूने येणारे दूषित पाणी व सांडपाणी हे जलवाहिनी लिकेज स्वरूपात असल्याने त्या जलवाहिनीद्वारे विरेश्वर मंदिर तलावात दूषित पाणी येत आहे.
या संदर्भात संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रशासनास वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेले आहे. खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार व पाणी पुरवठा विभागाचे भोईर यांनी 28 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या स्टाफसोबत सदर स्थळी पाहणी केली व यातून मार्ग काढण्याचे सांगितले आहे. याशिवाय सदर सांडपाणी हे पाताळगंगा नदीत सोडत असल्याने पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
संपूर्ण शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून लिकेज असल्याने सांडपाणी जाणे ही नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारी बाब आहे. संबंधित समस्या त्वरित दूर करावी व नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या समस्यांचे निराकारण न केल्यास नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी खोपोली-खालापूर संघर्ष समितीच्या वतीने उग्र आंदोलन करण्याची भूमिका यावेळी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रशासनाचे काम असून सदर सांडपाणी मिश्रित पाणी जलवाहिनीतून येणे ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने त्वरित गळती बंद करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत व पाताळगंगा नदीत थेट सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करून सदर सांडपाणी नदीत न सोडण्यासाठी मोहीम राबवावी असे प्रतिपादन खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने डॉ. शेखर जांभळे व किशोर साळुंखे यांनी केले आहे.