खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यातील घोडीवली गावामध्ये गेली 28 वर्ष शिवभक्त अनंता पिंगळे हे तीन दिवशीय सप्ताहाचे हभप दादा महाराज राणे व हभप तानाजी महाराज करणूक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करीत असताना या वर्षी या सप्ताहाची सांगता महाकाल्याच्या किर्तनाने करण्यात आली.
या सप्ताहाचा प्रारंभ 25 तारखेला झाला असून त्यांची सांगता गुरुवारी 27 तारखेला करण्यात आली. या सोहळ्यात महारुद्रभिषेक, होम हवन, महाआरती, शिवलीला अमृत, शिवस्तुती पठण, काकड आरती, हरिपाठ, कीर्तन, जागर भजन अशा धार्मिक कार्यक्रम होत असल्यामुळे घोडीवली गावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
पहिल्या दिवशी कीर्तनकार वैष्णवीताई कडू तर दुसऱ्या दिवशी तुषार महाराज दळवी यांचे कीर्तन पार पडले तर कार्यक्रमाची सांगता गुरुवर्य तानाजी महाराज करणूक यांच्या कीर्तनाने झाली. शिवभक्त अनंता पिंगळे हे गेली 28 वर्ष घोडीवलीमध्ये स्वतःच्या घरी हा कार्यक्रम साजरा करीत असून अनंता पिंगळे यांच्या घरी जमिनीतून स्वयंभु पिंड निघाली असल्याने त्यांच्या अंगामध्ये महाशिवरात्रीमध्ये रात्री बाराच्या सुमारास नागदेवता प्रगट होते. तर रात्री दर्शनासाठी आजूबाजूच्या परिसरातील भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.